पेल्लोरा येथे शेतकऱ्यांनी सुरू केला ‘गुळाचा’ लघु उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:08+5:302021-03-20T04:26:08+5:30
जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग : शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणार प्रकाश काळे, गोवरी : निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची ...
जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
: शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणार
प्रकाश काळे,
गोवरी
:
निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची नेहमीच होरपळ झाली आहे. काळानुरूप शेतातील पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे, राजुरा तालुक्यातील पेल्लोरा येथील प्रयोगशील शेतकरी गजानन जुनघरी यांनी यावर्षी पारंपरिक पीक पद्धतीला बगल देत नैसर्गिक शेती करीत ऊस लागवड करून गुळाचा लघु कारखाना सुरू केला आहे.
जिल्ह्यातील पहिला गुळाचा लघु कारखाना उभारून इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
चंद्रपूर जिल्हा हा काळे सोने (कोळसा) व पांढरे (कपाशी) सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. यात राजुरा तालुक्यात बहुतांश जमिनीवर वेकोलिने जाळे पसरविले आहे तर उर्वरित शेतजमिनीवर जास्तीत जास्त शेतकरी पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घेत आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून वाढत असलेला गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव यामुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान, निसर्गाचे अस्मानी सुलतानी संकट, दरवर्षी होत असलेली नापिकी यामुळे उत्पन्नापेक्षा लागवड खर्च जास्त असल्याने शेतकरी वर्ग पर्यायी पिकांकडे वळले आहे. पेल्लोरा येथील जुनघरी यांनी नैसर्गिक शेतीसंबंधी अमरावती येथील पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे मार्गदर्शन घेऊन सतीश पिंपळे यांच्या सल्ल्यानुसार मागील वर्षी पंधरा हजार रुपये खर्च करून दोन एकर शेतामध्ये माउली नावाच्या उसाची लागवड केली. शेतात लागवड केलेल्या उसाची मळणी करून ऊस दुसऱ्याला विकण्यापेक्षा स्वतःजवळ असलेले भांडवल लावून शेतात गूळ तयार करण्याचा लघु कारखाना सुरु केला.
बॉक्स
दोन एकरातून पाच टन गूळ
गजानन जुनघरी यांनी कवडु वडस्कर (मोहुर्ली), सुनील उमरे (नंदोरी) यांच्या मदतीने आठ लाख रुपये खर्च करून गूळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेले यंत्र, साचे, टप, कढई, बाॅयलर व इतर साहित्य खरेदी करून कारखाना सुरु केला आहे.
जुनघरी यांना दोन एकर उसापासून तीन लाख रुपये किमतीच्या पाच टन गूळ निर्यातीची अपेक्षा आहे.
बॉक्स
रसायनाचा वापर नाही
गूळ तयार करीत असताना यात कोणत्याही रसायनाचा वापर न करता विलायची, अद्रक व जायफळ टाकून शुद्ध नैसर्गिक गुळाची निर्मिती केली जात आहे.
मानवी जीवनात गुळाचे महत्व वाढले असून आरोग्यासाठी साखरेपेक्षा गुळाला अधिक पसंती असल्याने गुळाच्या विक्रीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. गुळाला वाढती मागणी पाहता जुनघरी यांनी हा प्रयोग सुरू केला असून सध्या परिसरात या गुळाला मागणी वाढली आहे. शेतामध्येच ८० ते ८५ रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे.
कोट
पारंपरिक पीक पद्धतीमुळे शेतात फायदा कमी व नुकसान जास्त यामुळे नवीन प्रयोग म्हणून ऊस लागवड व गूळ तयार करण्याबद्दल माहिती घेऊन मित्राच्या मदतीने कोणतेही कर्ज न घेता जवळ असलेले भांडवल गुंतवून नैसर्गिक गूळ तयार करण्याचा लघु कारखाना (गुऱ्हाळ) सुरू केला आहे. यात निश्चितच कमी खर्चात जास्त नफा मिळणार आहे,
-गजानन जुनघरी, प्रगतशील गूळ उद्योजक शेतकरी, पेल्लोरा.