शेतकऱ्यांनी बंद केले रस्त्याचे काम
By admin | Published: April 15, 2017 12:46 AM2017-04-15T00:46:20+5:302017-04-15T00:46:20+5:30
पांदण रस्त्यामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीचे नुकसान होत असल्याने शेतातून जाणारा २ किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडल्याचा प्रकार निलसनी पेडगाव येथे घडला.
निलसनी पेडगाव येथील घटना : पांदण रस्त्यामुळे शेतीची विभागणी
चंद्रपूर : पांदण रस्त्यामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीचे नुकसान होत असल्याने शेतातून जाणारा २ किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडल्याचा प्रकार निलसनी पेडगाव येथे घडला.
निलसनी पेडगाव ग्रामपंचायतअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पांदण रस्त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले.
शासनाच्या ध्येय धोरणानुसार या पांदण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, या रस्त्यासाठी शेतकऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही. रस्त्याचे कोणतेही सीमांकन न करता बेधडक रस्ता सुरू करण्यात आला. त्यामुळे शेतीचे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि पांदण रस्त्याचे काम बंद पाडले. पांदण रस्ता म्हणून १९७८ पासून शासकीय दप्तरात कोणतीही नोंद नसताना भूमापन क्रमांक २७८ या शेतशिवारातून रस्त्याची निर्मिती करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले. हा पांदण रस्ता निखिल रेप्पलवार, सुधीर मेश्राम, भाकरे अशा अनेक शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेतीतून जात असल्याने शेतीचे दोन तुकड्यांत विभाजन होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा या पांदण रस्त्याला विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असताना सोबतच हा रस्ता १९२० च्या बंदोबस्तानुसार नोंद असला तरी महसूल रेकॉर्डला याची नोंद नसल्याने हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
दरम्यान, रस्त्याची पाहणी करण्याकरिता महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. रेकॉर्डला नोंद नसल्यामुळे तहसील कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)