धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:30+5:30
नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक या तालुक्यात घेतले जाते. यावर्षी रोवण्यापासूनच मोठा पाऊस कधी पडलाच नाही. पण शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून रोवणी आटोपली व पीक जगविले. परिणामी हलके धान पीक निभायच्या मार्गावर आहे. मात्र आता या तालुक्यातील भारी धान पीक अंतिम टप्प्यात आहे.
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : धानाचे पीक अंतिम टप्प्यात येत असतानाच पावसाने डोळे वटारल्याने धानाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धडपड सुरू झाली आहे. मिळेल त्या मार्गाने व मिळेल त्या साधनाने पाणी कसे मिळेल व धान कसे वाचेल, याच विवंचनेत या शेतकरी आहेत.
नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक या तालुक्यात घेतले जाते. यावर्षी रोवण्यापासूनच मोठा पाऊस कधी पडलाच नाही. पण शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून रोवणी आटोपली व पीक जगविले. परिणामी हलके धान पीक निभायच्या मार्गावर आहे. मात्र आता या तालुक्यातील भारी धान पीक अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ ते दहा दिवसात धान गर्भावस्थेत येण्याचा काळ सुरू होईल. आणि नेमक्या याच वेळेस धानास पाण्याची मोठया प्रमाणावर आवश्यकता भासते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने घुमजाव केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी नाले, विहिरी या स्त्रोतातून आॅईल इंजिन, मोटरपंप याद्वारे पाणी घेऊन पीक वाचविण्याची धडपड करीत आहेत.
उत्पादनावर परिणाम होणार
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहे किंवा शेताजवळ नाला आहे, असे शेतकरी साधनांचा वापर करून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात असले तरी ज्या शेतकऱ्यांना अशी कोणतीही सोय नाही, अशा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार बसून त्याचा परिणाम उत्पादनावर निश्चित होणार आहे.