सिंचन विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना त्रास
By admin | Published: October 26, 2014 10:38 PM2014-10-26T22:38:48+5:302014-10-26T22:38:48+5:30
सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक
आयुधनिर्माणी (भद्रावती : सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे. संबंधितांनी ओलिताकरिता सुरळीत पाणी पुरवठा न केल्यास धान उत्पादन संकटात सापडण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहे.
चारगाव प्रकल्पांतर्गत सिंचन होत असलेला आलिताचा अंतीम टप्पा म्हणजे चंदनखेडा परिसरातील शेती. या परिसराततील धान उत्पादक चारगाव धरणातून मिळणाऱ्या पाण्याद्वारे आपापल्या शेतीत ओलीत करुन शेतीत धानाचे उत्पादन घेतात. परंतु या प्रकल्पांतर्गत येणारा हा शेवटचा टप्पा असल्याने या भागात नेहमीच पाण्याच्या वितरणाबाबत तक्रारी असतात. सिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे व दोषपूर्ण वितरणपद्धतीमुळे धानाला वाजवी पाणी मिळत नाही.
त्यामुळे शेतीत पाणी मिळविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये आपापसात भांडणतंटे होत असल्याचे बोलले जाते.
असेही सांगण्यात येत आहे की केवळ अर्ध्या एकर शेतीत पाणी घेण्याकरिता शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून आठवडाभर नाहक त्रास भोेगावा लागतो. त्यामुळे या परिसरातील धानउत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळविण्याकरिता संबंधित विभागातील कर्मचारी अपुरा पाणी पुरवठा करीत असल्याचा आरोपही दबक्या आवाजात होत आहे. आर्थिक व्यवहारामुळेच अनेकांना हेतुपूरस्पर पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. चंदनखेडा- मुधोली परिसरातील युवा कार्यकर्ते सुधीर मुडेवार, किशोर ठावरी आमदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यात सिंचन विभागाने या कुचकामी व अकार्यक्षम पाणी पुरवठा यंत्रणेत बदल घडवून सर्व शेतकऱ्यांना आवश्यक पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. नवनियुक्त आमदार य संबंधात काय भूमिका घेतात, याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)