शासनाच्या उदासीन धोरणामुळेच शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Published: May 24, 2015 01:58 AM2015-05-24T01:58:52+5:302015-05-24T01:58:52+5:30
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला ...
चंद्रपूर : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला असताना शासनाची मदतही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यात शासनाचे काही धोरणही शेतकऱ्यांविरोधी असल्याने शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो, असे प्रतिपादन आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी केले.
आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्यावतीने १७ ते २४ मे या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात स्वतंत्रपणे दोन वेगवगळ्या शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा काढण्यात आल्या. विदर्भात ही यात्रा अमरावती, वर्धा नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथे १९ मे रोजी दाखल झाली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या या यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाण्याचा हा प्रयत्न होता. खांबाडा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब नत्थू संबा देठे, अंकेश जनार्धन भोयर यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. या परिस्थितीत कसे लढायचे यावर संवाद साधण्यात आला. अशाप्रकारे चिंचाळा, जामणी, पिजदूरा, ताडगव्हान, येन्सा, शेंबळ आदी गावात आपची संवाद यात्रा पोहचली. या यात्रेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली.
त्यानंतर वरोरा येथे सभा पार पडली. सभेला आप पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वरोरा येथील आंबेडकर चौकात ही सभा पार पडली. संवाद यात्रा यशस्वी करण्याकरीता जिल्हा संयोजक अॅड. किशोर पुसलवार, जिल्हा सचिव दीपक गोंडे, सतीष परचाके, महापालिका संयोजक प्रशांत येरणे, सुनील मुसळे, योगेश आपटे, सुनील भोयर, संदीप पिंपळकर, भिवराज सोनी, परमजीत सिंग, मनोहर पवार आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)