शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या नभाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 08:00 AM2022-06-11T08:00:00+5:302022-06-11T08:00:06+5:30

Chandrapur News यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असतानाही अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची कोणतीही चाहूल दिसून येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

farmers waiting for monsoon | शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या नभाकडे !

शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या नभाकडे !

googlenewsNext
ठळक मुद्देतप्त उन्हामुळे शेतीकामाचा खोळंबा तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त

दीपक साबने

चंद्रपूर : अतिदुर्गम आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवरच शेतकरी अवलंबून असल्याने पेरणीकरिता पावसाची सुरुवात होणारे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृग नक्षत्रातच दरवर्षी पेरणी केल्या जाते. परंतु यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असतानाही अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची कोणतीही चाहूल दिसून येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

अजूनही जाणवत असलेल्या उन्हाच्या तीव्र उष्ण झळामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामाचा खोळंबा होऊन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे वर्षभराच्या रोजीरोटीसाठी शेतात पेरणीकरिता शेतकऱ्यांना आणि उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी सर्वांच्याच नजरा पावसाच्या आगमनासाठी आकाशाकडे लागल्या आहेत.

पाऊस लांबणीवर गेल्यावर खरीप हंगामाच्या तयारीचा वेग मंदावणार आहे. या वर्षात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. असे असले तरी अद्याप शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस बरसला नसल्याने शेतकऱ्यांनी तडजोड करून सावकारी कर्ज काढून पेरणीसाठी विविध प्रकारचे बी-बियाणे एकत्रित करून ठेवले आहे. वेळीच पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केलेले आहे, त्याचे कर्जाचे डोंगर तर उभे राहणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. काही उर्वरित कामे शेतकरी करीत आहेत. परंतु उन्हाच्या प्रचंड झळा लागत असल्याने शेतीकामासाठी हे उष्ण तापमान अडथळा ठरत आहे.

पेरणीला होणार विलंब

पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरू होऊन दोन दिवसांचा कालावधी लोटला. तरी पण अद्याप तालुक्यातील शिवारात पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने नदी, नाले व बंधारे कोरडेच दिसत आहेत. शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून पेरणीकरिता विविध वाण उपलब्ध करून ठेवले आहेत तर काहींची तडजोड सुरू आहे. प्रामुख्याने जिवती तालुक्यातील शेतकरी हे जास्त प्रमाणात कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकाची लागवड करीत असतात. वेळेत पेरणी झाली की पिकाची चांगल्या स्थितीत वाढ होत असते, असे शेतकरी वर्गांचे म्हणणे आहे. म्हणून सर्व शेतकरी वर्गाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.

Web Title: farmers waiting for monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती