शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वितरणात हयगय सहन करणार नाही
By admin | Published: July 18, 2016 01:55 AM2016-07-18T01:55:15+5:302016-07-18T01:55:15+5:30
गत दोन वर्षापासून सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
हंसराज अहीर यांचे निर्देश : शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करा
चंद्रपूर : गत दोन वर्षापासून सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. चालू खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्याला तातडीने पीक कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींच्या बैठकीत दिले.
या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकाच्या अधिकारी व प्रतिनिधींसोबत खरीप पीक कर्ज वाटपाबाबत चर्चा केली. जिल्ह्यात राज्य शासनाने आदेश देवूनही शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यामुळे मोठ्या संख्येत शेतकरी कर्जापासून वंचीत राहिल्याचे दिसून येत आहे. बँकांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचीत राहत असल्याने यापुढे अशी स्थिती खपवून घेण्यात येणार नाही. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून तातडीने पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चर्चेत सहभागी होताना बँकांच्या अकार्यक्षमतेचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी बँक अधिकाऱ्यांवर कर्तव्यचुकारपणा केल्याबद्दल कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा दिला.
केंद्र सरकारने पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला प्राथमिकता देण्याचे धोरण ठरविले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असतानाही बँकांमुळे कर्ज पुरवठा झाला नाही तर अशा शाखांमध्ये बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल, अशी कठोर भूमिका ना. अहीर यांनी घेतली. बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. अॅड. संजय धोटे, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. राजू तोडसाम, जि. प. सभापती देवराव भोंगळे, राहुल सराफ, राजू घरोटे, शेख जुम्मन रिझवी, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)