आर्थिक कोंडी असताना शेतकऱ्यांना मजुरांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:00 AM2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:01:03+5:30
वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकºयांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्याचा मजुरांची नितांत गरज पडते. पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाल्याने त्याला इतर गावातून मजूर आणण्यासाठी वाहनाचा खर्चही भरावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन तसेच दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच आता पावसाळी सुरू झाल्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, मजुरांना मजुरी देताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
यावर्षी बियाणे, खते, कीटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धानाचे बियाण्याचे भाव हजारोंच्या घरात आहे. धान तसेच कपाशीच्या अनेक प्रकारच्या प्रजाती पाहून शेतकरी सुद्धा भांबावले आहेत. याही परिस्थितीत वाढीव भावाने बियाण व खते घेऊन शेतकरी आपली शेती करण्यास पुढे आला आहे.
वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्याचा मजुरांची नितांत गरज पडते. पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाल्याने त्याला इतर गावातून मजूर आणण्यासाठी वाहनाचा खर्चही भरावा लागतो. मजुरी वाढ व बियाणे, खते, औषधे यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढत मात्र शेतकऱ्यांच्या मालाला शासन व व्यापारी योग्य भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. सध्या पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र पिकविलेला मालच विकला नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.
अनेकांनी धरला शेतीचा मार्ग
काही दिवसापूर्वी शेतीला मोठे महत्त्व होते. मात्र मध्यंतरी नोकरीला महत्त्व आले. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आणि बहुतांश तरुणांनी गावाचा रस्ता धरला. त्यामुळे सध्या शेतीला पूर्वीसारखेच महत्त्व प्राप्त होत आहे. मात्र पिकविलेल्या मालाला योग्य भाव तसेच बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मागील काही वर्षांपासून शेती करणे कठीण झाले आहे. पिकविलेल्या मालाला योग्य भाग मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा ताण पडत आहे. त्यातच आता लॉकडाऊमुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने मदत करणे गरजेचे आहे.
- संभाशिव जुनगरी,
शेतकरी, गोवरी