शेतातील पऱ्हाला कावडीने पाणी

By Admin | Published: July 11, 2015 01:41 AM2015-07-11T01:41:18+5:302015-07-11T01:41:18+5:30

मूल: पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतात धानाचे पेरलेले पऱ्हे करपायला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागले आहे.

The farmhouse water cavity | शेतातील पऱ्हाला कावडीने पाणी

शेतातील पऱ्हाला कावडीने पाणी

googlenewsNext

प्रेरणादायी : जुनासुर्ला येथील शेतकऱ्याचा पिके जगविण्याचा प्रयत्न
मूल: पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतात धानाचे पेरलेले पऱ्हे करपायला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागले आहे. मात्र मूल तालुक्यातील मुर्लीधर आत्माराम लोडेल्लीवार या शेतकऱ्याने खचून न जाता गुंड व कावडीने धानाच्या पऱ्ह्यांना पाणीपुरवठा करुन पऱ्हांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शेतकरी शेतात राब राबतो. कर्ज काढून पिकविलेल्या शेतातून धानाला पाहिजे त्या प्रमाणात भाव दिला जात नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीचे पालन पोषण करण्याचा यक्ष प्रश्न उभा ठाकतो. मात्र पोटाची खडगी भरण्यासाठी व गरजांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतो. मूल तालुक्यात १४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. पाऊस समाधानकारक आल्यानंतर पेरणी करण्यासाठी धावपळ सुरु झाली. सारी कामे बाजूला सारुन शेतकऱ्यांनी प्रथमत: शेतीमध्ये धानाची पेरणी केली. मात्र धानाच्या पेरणीनंतर वरुणराजाची अवकृपा झाली. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पऱ्हे करपायला लागली आहे. शेतकरी पाऊस येण्याची आतूरतेने वाट बघत असताना मात्र वरुणराजाची अपकृपाच शेतकऱ्यांवर असल्याचे जाणवले. दुबार पेरणी होऊ नये, यासाठी जुनासूर्ला येथील मुर्लीधर आत्माराम लोडेल्लीवार या शेतकऱ्याने मजुरांकरवी जवळ असलेल्या तलावातील पाणी गुंड व कावडीने टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
सदर प्रयत्न सफल होईल की नाही, हा नंतरचा प्रश्न असला तरी लोडेल्लीवारसारखे शेतकरी शेतीसाठी प्रयत्नरत असल्याने इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. एकीकडे पावसाची दडी, दुसरीकडे कर्जाचा बोजा तर तिसरीकडे मजुरीने गुंड व कावडीने पाणी टाकण्यासाठी केलेला प्रयत्न यामुळे शेतकरी खचला असला तरी आपली हिंमत सोडली नाही, हेच यावरुन दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The farmhouse water cavity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.