वाघाच्या दहशतीमुळे शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:27+5:30

पूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिध्द होते. आता संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच वाघ, बिबट्यासाठी नावारुपास येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती २५ फेब्रुवारी १९८६ ला करण्यात आली. येथील स्थानिक आदिवासी यांचा देव ‘तारू’ या नावावरून ताडोबा हे नाव देण्यात आले तर अंधारी वन्यजीव अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या नदीवरून अंधारी हे नाव देण्यात आले आहे.

Farming in crisis due to tiger terror | वाघाच्या दहशतीमुळे शेती संकटात

वाघाच्या दहशतीमुळे शेती संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देशिवारात वावर वाढला : पूर्वीसारखे बिनधास्त शेतात जाणे दुरापस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्हा देशपातळीवर लक्षवेधक ठरला आहे. वाघाचे हमखास दर्शन म्हणून ताडोबाला संबोधले जाते. मात्र आता हे व्याघ्रदर्शन संपूर्ण जिल्ह्यातच होत आहे. एक दोन तालुके वगळले तर जवळजवळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जंगलात वाघाचा वावर दिसून आला आहे. मात्र हे वाघ, बिबटे आता शेतशिवारात आणि गावालगत येऊ लागल्याने शेती व्यवसाय संकटात आला आहे.
पूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिध्द होते. आता संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच वाघ, बिबट्यासाठी नावारुपास येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती २५ फेब्रुवारी १९८६ ला करण्यात आली. येथील स्थानिक आदिवासी यांचा देव ‘तारू’ या नावावरून ताडोबा हे नाव देण्यात आले तर अंधारी वन्यजीव अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या नदीवरून अंधारी हे नाव देण्यात आले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ६२५,४० चौरस किमीमध्ये असून सभोवताली ११०१ चौरस किमी क्षेत्र हे बफर म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रातील हा दुसरा व्याघ्रप्रकल्प आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील फक्त २० टक्के भाग पर्यटकांना खुला आहे. त्यामध्ये पर्यटकांना आजवर येडा अन्ना, वाघडोह, माधुरी, सोनम, काटेझरी मेल, गब्बर, मटकासूर, मोवा खड्डा, कॅटरिना, तारा, माया अशा विविध नावांच्या वाघांनी मोहित केले आहे. हमखास वाघोबाचे दर्शन होते म्हणून पर्यटकही ताडोबाला भेटी देऊ लागले. हळूहळू विदेशी पर्यटकांनाही येथील वाघांची भूरळ पडत गेली. या वाघांनी वनविभागाला चांगलाच महसूल मिळवून दिला. मात्र आता हे वाघच ताडोबाबाहेरील लोकांसाठी कर्दनकाळ ठरू लागले आहे.
शेतशिवारात अगदी पाळीव प्राण्यांप्रमाणे हे वाघ, बिबटे दिसू लागले आहेत. पहाटे किंवा रात्री शेतात जाण्यास शेतकरी तयार नाहीत. कधी वाघाचे दर्शन होईल आणि हल्ला याचा काहीही नेम उरलेला नाही.
शासनाने वन्यजीव सरंक्षण कायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे सरंक्षण मिळाले आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शिवारात शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे नुकसान तर करतातच पण शेतकºयांवरही हल्ले करून शेतकऱ्यांचा जीव घेतात. जंगलालगत असलेल्या शेतशिवारात रात्र आणि दिवस वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे. पेरणीपासून तर पिक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करावे लागत आहे.

वाघ पोहचला चंद्रपूरपर्यंत
चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र आहे. चंद्रपूरच्या सभोवताल कोळशाच्या खाणी, वीज केंद्र, एमईएल व इतर काही उद्योग आहेत. असे असतानाही चंद्रपूरपर्यंत आता वाघ पोहचला आहे. बुधवारी पहाटे नागरिकांना इरई नदीच्या पात्राजवळ वाघाचे दर्शन झाले. उर्जानगर परिसरातही वाघाचा वावर आहे. एवढेच नाही तर चंद्रपूर वीज केंद्र परिसरात बिबटेही दिसून आले आहेत. काही महिन्यापूर्वी तर एक अस्वल चक्क चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागात आले होते.

शेतात जाण्याची मजाच गेली
शेतात जाण्याच्या आकर्षणामुळे शहरी भागात राहणारे नागरिक विशेषत: तरुण गावखेड्यातील आपल्या नातेवाईकांकडे जायचे. रबी हंगाम सुरू असताना तर खास शेतात जाण्याची, तेथील तुरीच्या शेंगा, हरभरा खाण्याची मजा औरच असते. त्यामुळे शहरातील नागरिक या कालावधीत गावातील आपल्या नातेवाईकांकडे हमखास जायचे. तिथे जाऊन शेतात धम्माल मजा करायचे. मात्र आता वाघ, बिबट्याच्या दहशतीमुळे शहरातील नागरिक तर सोडाच गावातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे.

अनेक शेतकऱ्यांचा बळी
पूर्वी जंगलात सरपणासाठी गेलेल्यांवर वाघ किंवा बिबट हल्ले करीत असत. यावेळी चुका नागरिकांच्या आणि त्यांच्या गरजांच्या होत्या. मात्र आता तर चक्क शेतातच वाघांचे हल्ले होत आहे. अनेकदा शेतात काम करीत असलेल्या शेतकरी, शेतमजुरांवर वाघाने हल्ला करून ठार केले आहे. काही महिन्यांपूर्वी राजुरा, सिंदेवाही, भद्रावती तालुक्यातील काही भागात वाघ, बिबट्याचा एवढा धुमाकूळ वाढला होता की शेतकऱ्यांनी शेतात जाणेच बंद केले होते.

वाघाचे प्रजननही ताडोबाच्या बाहेर
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अनेक वाघ उन्हाळ्याच्या दिवसात शिकार आणि पाण्याच्या शोधात प्रकल्पाबाहेर येतात. त्यानंतर अनेक वाघांचे प्रजनन हे ताडोबाच्या बाहेरच होते. त्यामुळे त्यांचे बछडे हे प्रकल्पाबाहेर असतात. त्यांचा अधिवास ताडोबाबाहेरील जंगलात असतो. या प्रकारामुळेही ताडोबाबाहेर वाघांची संख्या वाढत आहे.

Web Title: Farming in crisis due to tiger terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ