शेतीही गेली अन् मोबदला नाही
By admin | Published: May 22, 2016 12:31 AM2016-05-22T00:31:45+5:302016-05-22T00:31:45+5:30
लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन घेतल्या कामही सुरू झाले.
आता जगायचे कसे : लघुसिंचन विभागाने केले शेतकऱ्यांना भूमिहीन
जिवती : लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन घेतल्या कामही सुरू झाले. जोमात काम सुरू असतानाच महसूल विभागाने आडकाठी टाकल्याने सिंचन तलावाचे काम तर बंद पडलेच. पण तलावासाठी जमिनी हस्तांतरित करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मोबदलाही दिला नाही. उलट होती तेवढी शेती खोदून टाकली. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे. ना शेती, ना मोबदला. त्यामुळे आता जगायचे कसे, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
सिंचन तलावासाठी शेती हस्तांतरीत करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांचं जगण केवळ शेतीच्या आधारावर आहे. होती तेवढी शेती तलावासाठी घेतली. जगण्याचा आधार हिरावून तर घेतलाच. पण १५ दिवसांत इस्टीमेट तयार करुन मोबदला देण्याचे आश्वासनही दिले.
मागील वर्षीही शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. यावर्षीही करता येणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिवतीसह परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. शेतीच्या बदल्यात मोबदला मिळेल व थोड्याफार शेतीत सिंचनाची व्यवस्था करता येईल, या आशेवर शेती हस्तांतरित करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. अनेकदा शेतीच्या मोबदल्या संदर्भात शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, काम होईल. थोडा वेळ लागेल. काही दिवस पुन्हा थांबा, अशीच उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. गेल्या महिनाभरापासून सिंचन तलावाचे काम बंद पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. संबंधित अधिकारी कामावर येत नाहीत.
मोबदला मिळाला नसल्याने जगण्याचा आधारही लघु सिंचन विभागाच्या तलावाने हिरावला आहे. आज शेतकरी पूर्णत: भूमिहिन झाला असून शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित बाबीकडे लघुसिंचाई विभागाने तातडीने लक्ष देवून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शासनाच्या अशा धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप आता केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)