जामीन मिळेपर्यंत मद्यपींचा घडला उपवास
By admin | Published: December 1, 2015 05:22 AM2015-12-01T05:22:40+5:302015-12-01T05:22:40+5:30
तेलंगणातून दारू पिऊन येणाऱ्या वेगवेगळ्या पाच लोकांना लाठीच्या ठाणेदारांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल
गोंडपिपरी : तेलंगणातून दारू पिऊन येणाऱ्या वेगवेगळ्या पाच लोकांना लाठीच्या ठाणेदारांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस ठाण्यात नेले. परवा सायंकाळच्या कारवाईनंतर आरोपींना अख्खी रात्र व दुसऱ्या दिवशीही जामीन मिळेपर्यंत नाश्ता तर सोडा, जेवणही देण्यात आले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी न्यायालयाच्या तक्रार पेटीत अर्ज केला. या अर्जातून त्यांनी ठाणेदारांचा अमानवीय व्यवहार न्यायालयाच्या लक्षात आणून दिला.
१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र तालुक्यातील तळीराम आपली हौस भागविण्यासाठी लगतच्या तेलंगणातील गावांचा आसरा घेत आहेत. तेलंगणा व महाराष्ट्रातील टोकावरील गावातील नागरिकांचे संबंध असल्याने त्यांचे ये-जा सुरूच असते. आलोच तर थोडीशी घेऊन जावी, असे म्हणून ते घोटभर घेऊन आपल्या गावाकडे परतत असतात. सीमावर्ती भाग लाठी पोलीस स्टेशनअंतर्गत येतो. परवा सायंकाळी तेलंगणातून दारू पिऊन येत असताना खराळपेठ येथील स्वप्नील फुलझेले, संतोष तोरे, वढोलीतील हरिश्चंद्र खरबनकर, सुपगाव येथील राजाराम दुर्गे आणि भंगाराम तळोधीतील अविनाश मराठे यांना पकडण्यात आले.
सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून लाठी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. आरोपीला अटक केल्यानंतरची जबाबदारी ही पोलिसांची असते. मात्र लाठी पोलिसांनी आरोपींना साधा नास्ता तर सोडा रात्रभर उपाशी ठेवले, दुसऱ्या दिवशी सायंकाळी आरोपींना गोंडपिपरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळपर्यंतही आरोपींना जेवण देण्यात आले नव्हते. कोर्टात २४ तासांपासून उपाशी असलेले आरोपी भूकेने अगदी व्याकूळ झाले होते. मात्र, त्यांच्याकडे पोलिसांकडून पुरते दुर्लक्ष करण्यात आले.
दरम्यान, आरोपींची शनिवारी सायंकाळी ७ वाजता जमानत झाली. त्यानंतर या पाचही लोकांनी न्यायालयाच्या तक्रार पेटीत न्यायाधीशांच्या नावाने ठाणेदारांच्या या अमानवीय व्यवहाराची तक्रार केली. आमच्यावर जेवण न देण्याचा जो अन्याय करण्यात आला तसा अन्याय इतर कुठल्याही आरोपींवर होऊ नये यासाठी न्यायाधीशांना अर्जाद्वारे साकडे घालण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)