वेकोलिविरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:08 AM2018-11-02T00:08:31+5:302018-11-02T00:09:14+5:30
दहा कामगारांचे अकारण स्थलांतरण व वेकोलिच्या मनमानी कारभारावर संतप्त झालेल्या कामगारांनी गुरुवारी माजरीच्या महाप्रबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे, वेकोलि माजरीच्या आयटक, एचएमएस, बीएमएस व सीटू या चारही कामगार संघटनेने कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : दहा कामगारांचे अकारण स्थलांतरण व वेकोलिच्या मनमानी कारभारावर संतप्त झालेल्या कामगारांनी गुरुवारी माजरीच्या महाप्रबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे, वेकोलि माजरीच्या आयटक, एचएमएस, बीएमएस व सीटू या चारही कामगार संघटनेने कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
पहिल्या दिवशी डम्पर आॅपरेटर प्रवीण सातपुते, रामदास आस्कर हे उपषणाला बसले. वेकोलि माजरी व्यवस्थापनाचा सध्या मनमानी कारभार सुरू आहे. येथील दहा कामगारांचे काहीही कारण नसताना माजरीवरुन वणी नार्थ येथे स्थानांतरण केले आहे. या दहाही कामगारांचे स्थानांतरण तत्काळ रद्द करावे, अन्यथा महाप्रबंधन कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा लेखी इशारा कामगारांनी दिला. मात्र त्याकडे वेकोलिने लक्ष दिले नाही. याशिवाय कामगारांच्या अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी चारही कामगार संघटनांच्या नेतृत्वात कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या कोळसा खदानीत कामगरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या, बुधवार बंद असतानाही काही मोजक्या कामगारांना अतिरिक्त काम देऊन इतर कामगारांवर अन्याय केला जात आहे, तो बंद करावा. वेकोलिने एकोना खाण कंत्राटदाराला न देता स्वत: चालवावी, कामगारांच्या पगारातून वीज बिलाची कपात करू नये, स्कूलबसच्या पैशाचीही कपात करू नये, आदी अनेक मागण्या कामगारांनी लावून धरल्या आहेत.
या आंदोलनादरम्यान एचएमएसचे अध्यक्ष जयनारायण पांडे म्हणाले, वेकोलि माजरीचे महाप्रबंधक एम. येलय्या हे मनमानी करीत आहेत. संघटनेसोबत चर्चा करताना जे बोलतात, तसे ते करीत नाहीत. उलट कामगारांवर अन्याय करतात. कामगार संघटनेला विश्वासात न घेता हिटलरशाहीने काम करीत आहेत, असेही पांडे म्हणाले.
या उपोषणात एचएमएसचे अध्यक्ष जयनारायण पांडे, महासचिव दत्ता कोंबे, आयटकचे धर्मपाल जगन्नाथ, अनिल विरुटकर, सीटूचे बिरेंद्र गौतम, मेहमूद खान, बीएमएसचे कनैया रहानडाले, मोरेश्वर आवारी, बबन जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना नाही
वेकोलि माजरीच्या रुग्णालयात डॉक्टर नाही व औषधसाठाही नाही. या प्रकारामुळे यापूर्वी माजरीतील खाण व्यवस्थापन अधिकारी रामन्ना यांचा वेळेवर उपचार मिळाला नाही म्हणून मृत्यू झाला होता. बायो मेट्रीक मशीनच्या बिघाडामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या सिस्टीममध्ये तत्काळ सुधारणा करुन कामागारांचे शोषण थांबवावे, खदानीत अनेक प्रकारचे धोकादायक काम असून त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत.
‘त्या’ कामगारांचे स्थानांतरण तात्पुरते रद्द
कामगारांनी उपोषण सुरू केले. चार संघटनांनी त्याला पाठिंबा दिला, याबाबत माहिती मिळताच वेकोलि प्रशासनात एकच खळबळ उडाली. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता महाव्यवस्थापन एम. येलय्या यांनी तत्काळ या चारही कामगार संघटनांची बैठक बोलावली. त्यात दहाही कामगारांचे स्थानांतरण तात्पुरते रद्द केले. कामगारांच्या इतर मागण्यांसंदर्भात दिवाळीनंतर बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कामगारांनी आपले उपोषणही तात्पुरते मागे घेतले.