पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:50 PM2018-03-19T23:50:48+5:302018-03-19T23:50:48+5:30
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पंधराशे ते सोळाशे वर्षांची वैभवशाली परंपरा या चंद्रपूर नगरीला असतानासुद्धा आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. आदिवासी समाजातर्फे विविध मागण्यांसाठी जटपुरा गेट येथे १० मार्चला धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांपासून याच मागण्यांसाठी विविध मोर्चे काढून प्रशासनाला निवेदने दिली आहेत. असे असतानाही अजूनपर्यंत शासन, प्रशासन आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आदिवासी नगरीतच आदिवासी बांधवांना नतमस्तक होऊन बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे.
चंद्रपुरातील जटपूरा गेटच्या आतील बाजूस राजे बल्लारशहा यांचा भव्य पुतळा बसवण्यात यावा. चंद्रपूर शहरातील चौकान्ाां महाराणी हिराई, राणी दुर्गावती, राजे खांडक्या बल्लाळशाह, भगवान बिरसा मुंडा, शहीद विर बाबूराव शेडमाके यांची नावे देण्यात यावी, आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण शुल्क व शिष्यवृत्ती हीे चालू शैक्षणिक सत्र संपत आले तरीही विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, ती रक्कम तत्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. येथील जिल्हा कारागृह परिसरात असलेल्या झाडाला अटकवून बाबूराव शेडमाके यांना फासावर चढवले होते, त्या जागेत शहीद स्मारक उभारून सौंदर्यीकरण करण्यात यावे आदी मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत. अशोक तुमराम, राजेंद्र धुर्वे, विनोद तोडराम, हरीश उइके, अमर निचत, जितेश कुळमेथे हे उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यातील आदिवासी बांधव वारलु मेश्राम, युवराज मेश्राम, जमुना तुमराम, वंदना मेश्राम, संदीप परचाके, बाळू कुळमेथे, कमलेश आत्राम, सतीश सोनटक्के, जयपाल गेडाम, गणेश इचनकर, वैशाली मेश्राम यांनी उपोषणमंडपाला भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
जिल्ह्यातून बऱ्याच आदिवासी बांधव या बेमुदत आमरण उपोषणाला दररोज भेटी देत आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या शासन, प्रशासन पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशी निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आदिवासी नगरीतील आदिवासींवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी आहे.
आज मोर्चा
मंगळवारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेणार आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने, दशरथ मडावी व राजू झोडे, शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांनी उपोषणमंडपाला भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.