प्रकल्पग्रस्त कामगारांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच
By admin | Published: March 27, 2017 12:38 AM2017-03-27T00:38:28+5:302017-03-27T00:38:28+5:30
उसेगाव, शेणगाव, वढा, घुग्घुस आणि पांढरकवडा या हद्दीतील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
चंद्रपूर : उसेगाव, शेणगाव, वढा, घुग्घुस आणि पांढरकवडा या हद्दीतील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज सहाव्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, सोमवारी कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर येथील अप्पर सहायक कामगार आयुक्तांकडे सोमवार २७ मार्चला तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.
२००८ साली उसेगाव, शेणगाव, वढा, घुग्घुस आणि पांढरकवडा या हद्दीतील सुमारे ३०० ते ३५० एकर शेतजमीन स्थायी स्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून अगदी अल्पदरात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्या. त्या मोबदल्यात १०३ प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात आली. मात्र मागील साडेतीन वर्षापासून प्रकल्पग्रस्त कामगारांना २६ दिवसांऐवजी सदर आस्थापनेत २० दिवसांची सेवा देण्यात येत आहे. या २० दिवसांचे वेतन ५ हजार देण्यात येत असून ते चार चार महिने थकीत असते. याविषयी कामगार आयुक्त कार्यालय येथे वारंवार बैठकी झाल्या. यावेळी कामगारांचे वेतन अदा करण्याची जबाबदारी मुख्य व्यवस्थानाची असल्याचे सांगण्यात आले. यावेळीसुद्धा आंदोलन करण्यात आले होते. त्यामध्ये कामगारांची दिशाभूल, फसवणूक करीत निष्फळ आश्वासने देत उपोषण सोडविण्यात आले होते. परंतु सात दिवसाच्या आत चार महिन्याचे वेतन मिळवून देण्याचे व सदर आस्थापनेत सुरक्षा रक्षकाचे काम मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने एक महिना होऊनही पूर्ण केले नाही. त्यामुळे कामगार आर्थिक व मानसिकरित्या त्रास झाला आहे. अखेर प्रकल्पग्रस्त कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. मागील पाच महिन्याचे थकीत वेतन देण्यात यावे, सदर आस्थापनेत महिन्याचे २६ दिवस रोजगार देण्यात यावे, सुरक्षा साधने देण्यात यावे, करारानुसार वेतन देण्यात यावे, महिन्याचे वेतन सात ते १० तारखेच्या आत देण्यात यावे. कुशल कामगार १८ हजार, अर्धकुशल कामगार १६ हजार, अकुशल कामगार १४ हजार प्रति महिना पगारवाढ देण्यात यावी, या त्यांच्या मागण्या आहे. दरम्यान, या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी २३ मार्चला सहायक कामगार आयुक्तांकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कामगार प्रतिनिधी हजर होते. परंतु कंपनी व्यवस्थापनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते. आता २७ मार्चला बैठक आयोजित केली आहे. (शहर प्रतिनिधी)