शहरातील मुख्य मार्गावर जीवघेणे खड्डे

By admin | Published: July 17, 2015 12:53 AM2015-07-17T00:53:11+5:302015-07-17T00:53:11+5:30

जडवाहतुकीमुळे शहरातील मुख्य मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण नाही.

Fatal pitches on the main street of the city | शहरातील मुख्य मार्गावर जीवघेणे खड्डे

शहरातील मुख्य मार्गावर जीवघेणे खड्डे

Next

राजुरा : जडवाहतुकीमुळे शहरातील मुख्य मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात या मार्गावर अनेकदा अपघात झालेले आहेत. शाळकरी मुले आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. मात्र, वर्दळीच्या मार्गावरील दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या परिसरात कोळसा खाणी व सिमेंट उद्योग आहेत. उद्योगांमुळे अहोरात्र जड वाहने या मार्गावरून धावतात. जडवाहतुकीमुळे शहरातील मुख्य मार्ग पूर्ण उखडला आहे. मुख्य मार्गावर महाकाय खड्डे आहेत. त्यामुळे वाहने चालविताना चालकास कसरत करावी लागते.
वर्दळीच्या मार्गावरील डागडुजीकडे बांधकाम विभागाचे लक्ष नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचलाऊ वृत्तीमुळे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यामुळे शहरातील मार्गावरील वाहतूक वाढली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर रस्ता उखडला आहे. त्यामुळे प्रत्येकजण खड्डे चुकविण्याच्या नादात प्रवास करीत आहे. हे अपघातास निमंत्रण देणारे आहे. शहरातील मुख्य मार्गाच्या दुरुस्तीबाबत प्रशासनही गंभीर नाही. त्यामुळे शहरातील रस्त्याची अवस्था भकास आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग असताना शहरातील मार्गाचे काँक्रिटीकरण होऊ शकले नाही, ही शोकांतिका आहे. नैसर्गिक संपदेच्या बळावर उद्योग वाढले. मात्र, या भागातील जनतेचे शोषणच सुरू आहे. खड्डे पडले की थातूरमातूर डागडुजी केली जाते. वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभाग डोळेझाक करतो. अनियंत्रित वाहतुकीवर कुणाचेही नियंत्रण नाही. कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ताडपत्री झाकलेली नसते. नियमांची पायमल्ली करीत सर्रास वाहतूक सुरू आहे. अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नाही. परवाना नसणाऱ्या चालकांची तपासणी होत नाही. रात्री अवैध जडवाहतूक चालते. येथील नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. शहरातील पार्किंग व्यवस्था ढेपाळली आहे. याला नगरपालिका प्रशासनही जबाबदार आहे. मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे बऱ्याचदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Fatal pitches on the main street of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.