चंद्रपूर-मूल-गडचिरोली मार्गाचे भाग्य उजळणार
By admin | Published: September 23, 2016 01:10 AM2016-09-23T01:10:16+5:302016-09-23T01:10:16+5:30
चंद्रपूर-मूल-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाची मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली दुरवस्था आता संपणार,
मुनगंटीवारांचे आदेश : सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाची मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली दुरवस्था आता संपणार, अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या महामार्गाच्या दुरावस्थेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिले. त्यावर मार्ग दुरूस्तीचे आश्वासन मिळाले आहे.
या मार्गाची दुरूस्ती तातडीने करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलिकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दर्शवित रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्याची तयारी दर्शविली. एवढेच नाही तर मार्गाच्या दुरूस्तीचे कामही सुरू केले आहे.
१० आॅक्टोंबरपर्यंत दुरूस्तीचे काम पुर्ण होेईल, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
हा मार्ग पावसामुळे मोठया प्रमाणावर क्षतीग्रस्त झाला होता. अनेक वाहनधारक या क्षतीग्रस्त रस्त्यामुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे दुरूस्तीसाठी नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. ११ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांना दिले होते.
त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांना प्रचंड त्रास होत असतानाही दखल न घेणाऱ्या बांधकाम विभागाला अखेर पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरच आपल्या कार्याची जाणीव झाली, हे विशेष ! (जिल्हा प्रतिनिधी)