भरकटलेले हरणाचे पिलू पोहोचले सुखरूप
By admin | Published: September 24, 2015 01:04 AM2015-09-24T01:04:13+5:302015-09-24T01:04:13+5:30
आपल्या कळपातून भरकटून अगदी चंद्रपूर शहराजवळ पोहचलेले हरणाचे पिलू जागृत नागरिकांच्या समयसूचकतेमुळे सुखरूपपणे वनविभागाच्या कार्यालयात पोहोचले.
चंद्रपूर : आपल्या कळपातून भरकटून अगदी चंद्रपूर शहराजवळ पोहचलेले हरणाचे पिलू जागृत नागरिकांच्या समयसूचकतेमुळे सुखरूपपणे वनविभागाच्या कार्यालयात पोहोचले.
बुधवारी दुपारच्या दरम्यान चंद्रपुरातील बिनबा गेटबाहेरील परिसरात एक हरणाचे पिलू घुटकाया परिसरात राहणारे आसिफ खान मकबूल खान यांना दिसले. हे पिलू एकटेच असल्याने आणि या परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने त्याचा जीव धोक्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वेळ न दडविता त्या पिलाला पकडले आणि आपल्या मित्राच्या मदतीने ते दुचाकीवरून वनविभागाच्या रामबाग नर्सरीत पोहचविले.
दरम्यान, एका दुचाकीवरून हरिणाचे पिलू दोन व्यक्ती नेत असल्याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सज्ज होत असतानाच काही वेळातच खुद्द दोन दुचाकीस्वारच पिलासह रॅपिड रिस्पान्स युनिटच्या कार्यालयासमोर दाखल झाले. तिथे पिलू पोहचविल्यावर रॅपिड रिस्पान्स युनिटचे प्रमुख आणि आरएफओ आशिष हिवरे यांनी त्या पिल्याला ताब्यात घतले, आणि रेकॉर्डवर नोंद घेतली. सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या पिलूची तपासणी करून त्यानंतर त्याला ताडोबाच्या जंगलातील हरणांच्या पिलांच्या कळपात सोडणार असल्याचे आरएफओ आशिश हिवरे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
पिलू पोहोचले दुचाकीवरून
आसिफ खान यांनी कसलाही वेळ न दडविता या पिल्याला आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवरून वनविभागाच्या कार्यालयात पोहचविले. भर रस्त्यावरून दुचाकीवरून हरिणाचे पिलू नेले जात असल्याचे अनेकांच्या लक्षातच आले नाही. मात्र प्रस्तुत प्रतिनिधीच्या लक्षात ही बाब येताच जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक बी.जी. गरड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या यंत्रणने दुचाकीच्या शोधासाठी तयारी सुरू करत असताना काही वेळातच दुचाकीसह पिलू वनविभागाच्या कर्यालयात पोहचले आणि सर्वांंचाच जीव भांड्यात पडला.