बापलेकांनी घडवून आणला गायडोंगरीतील दुहेरी हत्याकांड; आराेपीच्या मुलालाही अटक
By परिमल डोहणे | Published: September 7, 2022 05:57 PM2022-09-07T17:57:59+5:302022-09-07T18:03:33+5:30
मनोहर गुरुनुले व धनराज गुरुनुले या दोन भावात घराच्या जागेवरुन वाद होता.
चंद्रपूर : जागेच्या वादावरुन सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे एका दाम्पत्याला ठार केल्याची थरारक घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी मृतकाचा लहान भाऊ धनराज निंबाजी गुरुनुले (५२) याला पाथरी पोलिसांनी अटक केली होती. तपासात हत्याप्रकरणात आरोपीच्या मुलाचाही समावेश असल्याचे समोर आल्याने मंगळवारी सायंकाळी पाथरी पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. अंकुश धनराज गुरुनुले (१९) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आता या प्रकरणातील आरोपींची संख्या दोन झाली आहे.
मनोहर गुरुनुले व धनराज गुरुनुले या दोन भावात घराच्या जागेवरुन वाद होता. सोमवारी सकाळी घरी जाण्याच्या रस्त्यावरुन या दोन भावंडात पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात धनराज गुरुनुले याने मोठा भाऊ मनोहर निंबाजी गुरुनुले (६२) व वहिनी शारदा मनोहर गुरुनुले (४०) यांच्यावर बरशीने वार करुन ठार केले.
जागेच्या वादातून रक्तरंजित थरार; लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीची केली हत्या
याबाबत पोलीस पाटलाच्या फिर्यादीवरुन धनराज गुरुनुले याला अटक केली होती. दरम्यान तपास अधिकारी ठाणेदार मंगेश मोहोड यांनी कसून तपास केला असता, धनराजचा मुलगा अंकुशही या प्रकरणात आरोपी असल्याचे समोर आले. धनराजनेही तशी कबुली दिली. त्यावरुन त्याला मंगळवारी रात्री अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश मोडोड करीत आहे.
बरशी व बांबूची काठी जप्त
ठाणेदार मंगेश मोहोड यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून २४ तासातच प्रकरणाचा उलगडा करुन आरोपीला अटक केली होती. बापलेकांनी ज्या बरशीने व बांबूच्या काठीने वार करुन हत्या केली होती. ती बरशी व बांबूची काठी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच न्यायवैधक प्रयोग शाळेच्या पथकानेही काही नमूने गोळा केले आहेत.