बापरे ! चंद्रपुरातील धामनपेठ येथे अतिसाराने आठवडाभरात तिघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 02:45 PM2022-09-10T14:45:41+5:302022-09-10T14:46:01+5:30
आरोग्य पथक दाखल : रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले
आक्सापूर (चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत धामणपेठ येथे उलटी व हगवण आजाराने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला. तीन रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली. दरम्यान, रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यासाठी गावातील अंगणवाडी केंद्रात शिबिर सुरू आहे. बाधितांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
धामणपेठ येथे अतिसाराची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यात बापुजी बुचा धुडसे (६५) रा. धामनपेठ यांचा ४ सप्टेंबरला अतिसाराने मृत्यू झाला. त्यांना ३ सप्टेंबरला दाखल केले होते. त्यानंतर चंद्रपूर येथे रेफर केले असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गंगाराम कुडीराम मडावी (५५) रा. धामनपेठ यांचा ६ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यांना ५ सप्टेंबरला धामनपेठ येथे दाखल केले होते. त्यांचाही मृत्यू चंद्रपूरला रेफर केल्यानंतर चंद्रपूर शासकीय रुग्णालयात झाला.
तर अनुसया तुकराम सरवर (७२) रा. नवेगाव वाघाडे या आपल्या मुलीकडे धामनपेठ येथे आल्या असता त्यांना अतिसाराची लागण झाली. त्यांना मूळगावी नवेगाव वाघाडे येथे नेले असता ६ सप्टेंबरला त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी आरोग्य चमूला साथरोग नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार गावातील अंगणवाडी केंद्रात सुरू केलेल्या शिबिरात सुरू आहे. ७ सप्टेंबर रोजी बाह्यरुग्ण तपासणीत २१ रुग्ण तर ८ सप्टेंबर रोजी हगवण व उलटीची लक्षणे असलेल्या ११ रुग्णांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यात आला.
१२० कुटुंबांना दिले जीवनड्राप
आतापर्यंत १२० कुटुंबांच्या घरी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून जीवनड्रॉप बॉटलचे वाटप केले. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, घरात व परिसरात स्वच्छता ठेवावी, आहारात तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, संतुलित आहार घ्यावा, घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक लक्षणांवरून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे, असा दावा जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केला आहे.
सध्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाच पाणी नमुने, एक ब्लिचिंग पावडर नमुना तसेच आठ रुग्णांचे शौच नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन गृहभेटी देऊन सर्वेक्षण व जागृती केली जात आहे.
- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी