नागरिकांना वेठीस धरून एफडीसीएमची भरती
By admin | Published: August 27, 2014 11:23 PM2014-08-27T23:23:03+5:302014-08-27T23:23:03+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात वनविकास महामंडळाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र या प्रक्रियेसाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे. बाबुपेठ ते जुनोना मार्ग यासाठी बंद करण्यात आला आहे.
जुनोना रस्ता बंद : वाहनधारकांची डोकेदुखी वाढली
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वनविकास महामंडळाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र या प्रक्रियेसाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे. बाबुपेठ ते जुनोना मार्ग यासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोंभूर्णा तालुक्यात जाणाऱ्या नागरिकांना आपली वाहने नाईलाजाने मूल किंवा बल्लारपूर मार्गाने न्यावी लागत आहे. यात त्यांना सुमारे २५ ते ३० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.
वनविकास महामंडळ चंद्रपूर जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबवित आहे. वनपाल, वनरक्षक, चालक, चौकीदार अशी पदे भरली जात आहे. यासाठी शेकडो तरुणांनी आपले नामांकन दाखल केले आहे. या तरुणांची धावण्याची व इतर चाचणी घेण्यासाठी बाबुपेठ ते जुनोना या जागेची वनविकास महामंडळाने निवड केली. मात्र ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते आणि हा मार्ग चंद्रपूरला पोंभूर्णा तालुक्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत या मार्गावर भरती प्रक्रिया राहत असलीतरी दुपारी ३ वाजेपर्यंतही हा मार्ग नागरिकांसाठी मोकळा नसतो. पोंभूर्णा तालुक्यातील अनेक कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी चंद्रपूरला येतात व चंद्रपूरवरून पोंभूर्णाला जातात. त्यांच्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. मात्र वाहतुकीसाठी हा मार्ग बंद केल्याने नागरिकांना मूल-जानाळा- सुशी मार्गे व बल्लारपूर-येनबोडी-गिलबिली मार्गे पोंभूर्ण्याला जावे लागत आहे. यात त्यांना नाहक २५ ते ३० किलोमीटरचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)