१०१ धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:34+5:302021-06-06T04:21:34+5:30
चंद्रपूर शहरातील लोकसंख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे निवासी इमारती उभारण्याचा प्रश्न निर्माण झाला. काही जुन्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. ...
चंद्रपूर शहरातील लोकसंख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे निवासी इमारती उभारण्याचा प्रश्न निर्माण झाला. काही जुन्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे. मुसळधार पावसामुळे या धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात. महानगरपालिका क्षेत्रातील झोन क्रमांक १, २ आणि ३ मध्ये मान्सूनपूर्व तयार अंतर्गत जुन्या इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १०१ इमारती धोकादायक असल्याचे मनपाला आढळले. झोननिहाय उपायुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील यांच्या आदेशानुसार धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या इमारतीमध्ये राहू नये, अशा सूचना देण्यात आल्या.
इमारत पडल्यास जबाबदार कोण ?
चंद्रपूर शहरात १०१ धोकादायक इमारतीमध्ये सुमारे ७० ते ७५ कुटुंब राहतात. मनपाने मागीलवर्षी देखील नोटीस बजावली होती. त्यातील काही इमारत मालकांनी नियमांचे पालन करून पर्यायी व्यवस्था केली. लवकरच पावसाला सुरूवात होणार आहे. मनपाकडून नोटीस मिळाल्याचे इमारत मालकांनी लोकमतला सांगितले. पावसाळा तोंडावर असताना अद्याप इमारत मालकांकडून काही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे इमारत पडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट
वडिलोपार्जित घरात आम्ही तीन पिढ्यांपासून राहत आहोत. घराचा काही भाग थोडा जीर्ण झाला. सध्या नवीन घर बांधणे किंवा इतरत्र राहण्याची व्यवस्था करणे शक्य होत नाही. त्यामुळे अन्य पर्याय बंद झाले आहेत.
- शंकर केळापुरे,
विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर
नवीन घर बांधण्यासाठी स्थिती नाही. घराच्या मालकी हक्कावरून कुटुंबामध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे नाईलाजास्तव जुन्या घरात कुटुंबांसह राहावे लागत आहे.
- प्रमोद जंप्पलवार,
भिवापूर वाॅर्ड, चंद्रपूर
शहरातील धोकादायक इमारतींचे झोननिहाय सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. धोकादायक इमारती मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसाची अंमलबजावणी केली नाही, तर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून सुरक्षेचे अन्य उपायही केले जात आहेत.
- धनंजय सरनाईक, उपायुक्त, मनपा, चंद्रपूर.