मशीन सेटिंगच्या भीतीने उमेदवारांत धास्ती
By admin | Published: October 24, 2015 12:34 AM2015-10-24T00:34:13+5:302015-10-24T00:34:13+5:30
लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे
अनेक तक्रारी : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याची मागणी
खडसंगी : लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे. भारतीय लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असून जनतेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने प्रधानमंत्र्यापासून, मुख्यमंत्री तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकाऱ्यांची जनतेद्वारे निवड केली जाते. २००७ पासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्यात येत आहे. मात्र इव्हीएम मशीन सेट केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर, चिमूर नगरपरिषदमध्ये १ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरद्वारे नगर परिषदेची निवडणूक घेण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तथा नगर परिषदेतील उमेदवारांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले असल्याने हा विषय पुन्हा चर्चेचा ठरला आहे.
दरम्यान, येत्या नगर पालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन नको या मागणीसाठी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, माजी जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, इव्हीएम मशीनच लोकशाहीस मारक ठरत असल्याची बाब चिमूर तालुका काँग्रेस कमिटी व नगर परिषद उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत मांडली आहे. त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. या ईव्हीएममध्ये सेटिंग करण्यात येऊन चुकीच्या प्रतिनिधीची निवड होत असल्याच्या तक्रारी प्रात्यक्षिकासह निवडणूक आयोगाला अनेक राजकीय पक्षांनी यापूर्वी सादर केल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पार पडली व बोगस मतदान झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला राजू देवतळे, धनराज मालके, प्रकाश बोकारे, राजू हिंगणकर, गिरीश भोपे, सुधीर पंदीलवार, राजू शर्मा, अवी अगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)