९३ गावांंतील पाणी पिण्यास अयोग्य, जलजन्य आजारांची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:13+5:302021-07-10T04:20:13+5:30
जिल्ह्यातील ९३ गावांतील जलस्रोत दूषित असल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही. पावसाळा सुरू असल्याने जलजन्य ...
जिल्ह्यातील ९३ गावांतील जलस्रोत दूषित असल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही. पावसाळा सुरू असल्याने जलजन्य आजारांचा धोका आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. मात्र, नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाणी उकळून अथवा गाळूनच प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आरोग्य विभागामार्फत दरवर्षी ग्रामीण व शहरी भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. ज्या गावातील पाणी नमुने दूषित आढळतात. त्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जातात. दूषित पाण्याच्या प्रमाणात वाढ होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाते. गतवर्षापासून कोरोनामुळे नमुने घेण्यास कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. कोरोना प्रतिबंधात्मक कामे करीत असतानाच यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी
आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ३९ आरोग्य केंद्रांमार्फत १ हजार ८३१, तर शहरी विभागातील ६७८ अशा २ हजार ५०९ पाणी नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये ग्रामीण विभागात १०३ गावातील २३६ व शहरी विभागातील ६३ असे २९९ पाणी नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याची टक्केवारी ११.९२ एवढी आहे. पावसामुळे दूषित पाणी वाहून आल्याने जलजन्य साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी शुद्ध करूनच प्यावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दुर्गम गावांतील जलस्रोत तपासणीविना
कोरोनामुळे पाण्याचे नमुने घेण्यास अडचणी आल्या. राज्य शासनाकडून पाणी तपासणी नमुन्यांचे उद्दिष्ट दिले जाते. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, तालुका व ग्रामपंचायत अशा त्रिस्तरीय रचनेतून ही कामे केली जातात.
ज्या गावात पाणी शुद्धीकरणासाठी कोणते यंत्रच उपलब्ध नाही, अशा गावातील नागरिकांना उपलब्ध पाणी स्रोतावरच आपली तहान भागवावी लागते. जिवती तालुक्यातील अनेक गावांपर्यंत जिल्हा परिषदेची पाणी पुरवठा योजनाच पोहोचली नाही. त्यामुळे मिळेल त्या स्रोतांचा वापर केला जातो. आता कोरोना संसर्गाची लाट ओसरल्याने दुर्गम भागातील जलस्रोतांची जिल्हा प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी सरपंचांनी ‘लोकमत’कडे केली आहे.
नऊ तालुक्यात सर्वाधिक गावे बाधित
कोरोनामुळे यंदा प्रशासनाने नवीन विंधन विहिरी आणि हातपंप खोदले नाहीत. कोरोनापूर्वी दरवर्षी उन्हाळ्यात ही कामे केली जातात. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून पाणीटंचाई आराखडा तयार करताना या कामांचा प्राधान्याने समावेश केला जाताे. परंतु, कोरोना निर्बंधांमुळे यंदा आराखड्यानुसार कामे करता आली नाहीत. संभाव्य पाणी टंचाई असणाऱ्या गावांत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून ही कामे करण्यात आली, असा दावा संबंधीत अधिकारी करीत आहेत. खरे तर याच काळात जलस्रोतांचीही तपासणी होते. नमुने कमी असले तरी तपासण्या पूर्ण झाल्या. पाणी पिण्यास अयोग्य असणाऱ्या गावांमध्ये जिवती, कोरपना, नागभीड, गोंडपिपरी, पोंभुर्णा, भद्रावती, मूल व सिंदेवाही तालुक्यातील गावे सर्वाधिक आहेत.