क्यूआर कोडद्वारे नोंदविता येणार ‘आनंदाचा शिधा’चा अभिप्राय
By साईनाथ कुचनकार | Published: September 17, 2023 05:23 PM2023-09-17T17:23:45+5:302023-09-17T17:24:06+5:30
चंद्रपूर तालुक्यात २४ हजार ५९ संच पोहोचले रास्त दुकानात
चंद्रपूर : गौरी-गणेशोत्सवासाठी पुरवठा विभागामार्फत अंत्योदय लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ संच अवघ्या शंभर रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना वेळेत शिधा मिळावा यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. दरम्यान, आनंदाचा शिधा मिळाल्यानंतर बॅगवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे लाभार्थ्यांना शासनापर्यंत अभिप्राय नोंदविता येणार आहे. चंद्रपूर तालुक्यातील रास्त दुकानात आनंदाचा शिधा पोहोचला असून, वितरणही सुरू करण्यात आले आहे.
गौरी-गणपती सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी शासनाने आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेतला. याअंतर्गत चंद्रपूर तालुक्यात २४ हजार ६९ लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. या संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल राहणार असून, लाभार्थ्यांना केवळ शंभर रुपयांमध्ये स्वस्त धान्य दुकानातून मिळणार आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवापूर्वीच प्रत्येक दुकानामध्ये आनंदाचा शिधा पोहोचला असून वितरणासही सुरुवात झाली आहे. लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.