परिमंडळामधील ३६ कर्मचाऱ्यांचा सत्कार
By admin | Published: May 2, 2016 12:47 AM2016-05-02T00:47:33+5:302016-05-02T00:47:33+5:30
महावितरणमध्ये काम करताना महावितरणचे कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत काम करीत असतात....
महावितरण कंपनीचा उपक्रम : कामगार दिनानिमित्त केला गौरव
चंद्रपूर: महावितरणमध्ये काम करताना महावितरणचे कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत काम करीत असतात व उल्लेखनीय काम करुन महावितरणची मान उंचावण्याचे प्रयत्न करीत असतात. महावितरणने अशा कर्मचाऱ्यांच्या सेवेची दखल घेत १ मे २०१६ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर परिमंडलामधील ३६ कर्मचाऱ्यांचा, गुणवंत कामगार या पुरस्काराने, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता अनिल घोघरे, कार्यकारी अभियंता ए. डी. सहारे, कार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, प्रणाली विश्लेषक पंकज साटोने, सहाय्यक मुख्य व्यवस्थापक असित ढाकणेकर व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सुनिल पिसे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्कार करण्यात आलेल्या ३६ गुणवंत कर्मचाऱ्यांत चंद्रपूर मंडलातील १६, गडचिरोली मंडलातील २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सत्कार सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व भविष्यातही आपापल्या कर्याक्षेत्रात काम करताना ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे काम अशाच प्रकारे भविष्यात सुरु ठेवण्याचे आवाहन केले. तसेच काम करताना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले.
सत्कार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी गडचांदूर उपविभागात कार्यरत तंत्रज्ञ चंद्रभान नागरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या सत्कारामुळे आम्हा सर्वाची जवाबदारी पुन्हा काढली असून आपण सर्व ती पार पाडतांना महावितरणचा नावलौकीक वाढवू असा निर्धार व्यक्त केला. तसेच ग्राहकांना सेवा देताना महावितरणची सकारात्मक प्रतिमा निर्माण होणार असेच प्रयत्न करण्याचे अभिवचन त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)