नवनियुक्त कुलगुरूंचा मनोवेधकडून सत्कार
By admin | Published: October 25, 2014 01:12 AM2014-10-25T01:12:54+5:302014-10-25T01:12:54+5:30
गोंडवाना विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित आणि कोळसा- पोलाद संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ..
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित आणि कोळसा- पोलाद संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल खासदार हंसराज अहीर यांचा मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने एका छोटेखानी समारंभात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय बदखल उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. दीक्षित म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन आपण कार्य करण्याचा प्रयत्न करू. आपल्या कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल त्यांनी राज्यपालांचे आणि माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे आभार मानले.
खासदार हंसराज अहीर म्हणाले, संसदेत काम करताना आपणास बऱ्याच गोष्टींचा जवळून अभ्यास करायला मिळाला. आपण जबाबदारीला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. केंद्र सरकारने कोळसा- पोलाद संसदीय समितीचे अध्यक्षपद देऊन आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीला आपण योग्य न्याय देऊ, असे ते म्हणाले.
शांताराम पोटदुखे यांनी दोन्ही सत्कारमूर्तींचा भाषणातून गौरव केला. चंद्रपूरचे भूषण असलेली ही दोन्ही माणसे मोठ्या पदावर पोहचली, याचा आपणास आनंद असल्याचे ते म्हणाले. विजय बदखल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मनोवेधचे सचिव प्रशांत आर्वे यांनी, तर आभार मनोज साळवे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य सहकुटूंब उपस्थित होते. ( प्रतिनिधी)