जमिनीची सुपिकता घसरली

By Admin | Published: July 21, 2016 12:40 AM2016-07-21T00:40:26+5:302016-07-21T00:40:26+5:30

जमिनीची सुपिकता विविध घटकांवर अवलंबून असते. यामध्ये जमिनीची खोली, कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्यम आणि..

Fertilize the soil | जमिनीची सुपिकता घसरली

जमिनीची सुपिकता घसरली

googlenewsNext

लोह व जस्तचे प्रमाण कमी : उत्पादनावर पडणार परिणाम
मंगेश भांडेकर चंद्रपूर
जमिनीची सुपिकता विविध घटकांवर अवलंबून असते. यामध्ये जमिनीची खोली, कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण, सुक्ष्म जिवाणूंची संख्या इत्यादी यातच जमिनीच्या सुपिकतेचे रहस्य दडलेले असते. जमिनीचा पोत व जडण-घडण यावरच जमिनीचे फूल अवलंबून असते. मात्र उत्पादनासाठी रासायानिक खतांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर व गांढूळ व शेण खताची कमतरता या कारणांमुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे. परिणामी जिल्ह्यातील जमिनीची सुपिकता दरवर्षी ढासळत चालली आहे.
मृद नमुने तपासणी करून त्या आधारे जमिनीची सुपिकता ठरविली जाते. माती परीक्षणावरून प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. भौतिक गुणधार्मात जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश युक्त कॅल्शीयम व मॅग्नेशीयम, चुना, तांबे, लोह, मंगल, जस्त यांचे प्रमाण तपासले जातात. मात्र जिल्ह्यातील जमीनीमध्ये प्रामुख्याने जस्त, लोह या सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता आढळून आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याला उद्योगांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे उद्योगांची राख व प्रदूषनही जमिनीची सुपिकता कमी होण्यास कारणीभूत आहे. भद्रावती, राजुरा, वरोरा तालुक्यातील शेत जमिनीवर उद्योगांतून निघणाऱ्या राखेचे थर गोळा झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके काळवंडून जातात. ही दरवर्षी उद्भवणारी समस्या असून या समस्येपासून अद्यापही शेतकऱ्यांना उपाययोजना करून मुक्तता मिळेलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सल्ल्याची आवश्यकता आहे.

२२९ शेतकऱ्यांनी केली मृदा तपासणी
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांौना मृदा तपासणी करण्याचे आवाहन केले जाते. मात्र मृदा तपासणीसाठी शेतकरी उत्सूक दिसून येत नसल्याचे चित्र मृदा प्रयोगशाळेतील चाचणीवरून दिसून येते. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत जिल्ह्यातील केवळ २२९ शेतकऱ्यांनी स्वत: कार्यालयात येऊन मृदा तपासणी केली आहे. तर कार्यालयातर्फे ६ हजार ४०८ नमुने तपासण्यात आले असून दिनी केमिकल या खाजगी प्रयोगशाळेकडून ५ हजार ५१९ नमुने तपासण्यात आले आहेत.
खतांचा संतुलित वापर आवश्यक
उत्पादन वाढीसाठी संकरित व अधिक उत्पादनक्षम जातींच्या बियाणांचा वापर वाढला आहे. त्यासाठी रासायनिक खते व सिंचनाचे प्रमाणही वाढले. परिणामी असंतुलित खत वापराने जमिनीचे आरोग्य बिघडत असून अशा जमिनीमध्ये सेंद्रीय पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात करणे आवश्यक आहे.

सामू जमिनीच्या आरोग्याची गुरूकिल्ली
जमिनीचा सामू विविध अभिक्रियांचा निर्देशांक आहे. त्यातून जमीन आम्लधर्मी आहे की, विम्लधर्मी याबाबत माहिती मिळते. जमिनीचा सामू सात असल्यास जमीन उदासीन प्रकारात मोडते. सातपेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी व सातपेक्षा जास्त असल्यास विम्लधर्मी. सर्वसाधारणपणे ६.५ ते ७.५ या दरम्यान सामू असल्यास पिकांना लागणारी सर्वच अन्नद्रव्ये जमिनीत मिळतात आणि अशी जमीन सुपीक आणि उत्पादक म्हणून गणली जाते.
नैसर्गिक घटकांमुळे उत्पादनात सातत्य
एक इंच मृदा थर जमिनीवर तयार होण्यासाठी ३०० ते ५०० वर्षे लागतात. मृदा तयार होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या मृदेवरच मानवी जीवन अवलंबून आहे. मृदेमध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रीय पदार्थ, २५ टक्के पाणी व २५ टक्के हवा हे घटक आहेत. या घटकांचे प्रमाण योग्य राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ व सातत्य राखण्यास शक्य होणार आहे.
सुक्ष्म घटकांमुळे विविध गुणधर्म
जमीन ही एक सजीव संस्था असून, त्यात अनेक सुक्ष्म जीवजंतू (जीवाणू, बुरशी व इतर सुक्ष्म सजीव घटक) व प्राणी (गांडुळ) यांचा अधिवास असते. जमिनीस जैविक गुणधर्म प्राप्त होतात. तर जमिनीत असलेल्या खनिजामुळे व भौगोलिक घटकांमुळे जमिनीला भौतिक व रासायनिक गुणधर्म (जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब आणि चुनखडीचे प्रमाण) प्राप्त होत असतात.

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. जमिनीची सुपिकता दिवसेंदिवस घसरत असून कोणत्या गुणधर्माची कमतरता आहे, हे माती परीक्षणावरून समजते. त्यानंतर आवश्यक उपाययोजना सुचविल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून सुपिकता वाढविण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा.
- अनिल चावरे,
कृषी पर्यवेक्षक, जिल्हा मृदा चाचणी प्रयोगशाळा, चंद्रपूर.

Web Title: Fertilize the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.