पुस्तकाऐवजी विद्यार्थांचा हातात खताची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:48+5:302021-07-27T04:29:48+5:30
नीलेश झाडे गोंडपिपरी : ज्यांच्या हातात पुस्तक असायला हवे, त्या कोवळ्या हातात खताची टोपली आली. अल्प मजुरीवर ही मुले ...
नीलेश झाडे
गोंडपिपरी : ज्यांच्या हातात पुस्तक असायला हवे, त्या कोवळ्या हातात खताची टोपली आली. अल्प मजुरीवर ही मुले कपाशीला खत टाकताना शेताशेतात दिसू लागली आहेत. तसे हे चित्र नवे नाही. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कोरोना यायच्या आधी मुले खत टाकायला जायची. मात्र, कोरोना काळात हे प्रमाण वाढले आहे. उद्याचे भविष्य असे ज्यांना म्हटले जाते, त्या कोवळ्या जिवांना कोरोनाने अंधारगुहेत ढकलले आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला. ज्या शाळेत विद्यार्थांचा किलबिलाट ऐकू यायचा, त्या शाळेत भयाण शांतता दिसत आहे. पाठीवर दप्तर घेऊन ऐटीत जाणारे विद्यार्थी दोन वर्षांपासून डोळ्यांना दिसले नाहीत. शाळा बंद असल्याने मुले सैरभर झालीत. तसे नावाला ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थांकडे मोबाइल नाही. दिवसातून अनेकदा बत्तीगुल होते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे पालकांनीच पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अशात रिकामी असणाऱ्या या मुलांना कपाशीला खत टाकण्यासाठी शेतमालक घेऊन जात आहेत.
अल्प मजुरी देऊन या मुलांना राबविले जाते. कोरोना यायचा आधीही खत टाकताना मुले दिसायची. मात्र, कोरोना काळात शेतात राबविल्या जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात अनेक भागांत मुलांमार्फत खत टाकले जाते. गोंडपिपरी तालुक्याच्या येणाऱ्या हिवरा बस स्थानक परिसरातील एका शेतात मुले खत टाकताना दिसून आली. पुस्तकाऐवजी मुलांचा हातात खताची टोपली बघून त्यांचा भविष्याबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
बॉक्स
तेवढाच हातभार
सर्वसामान्यांचा घराचे गणित कोरोनाने बिघडविले. टाळेबंदीत रोजगार नव्हता. अनेकांनी व्यवसाय बदल केला, तर कुटुंब प्रमुखाच्या जाण्याने अनेक कोवळ्या हातांवर भार पडला. परत कोरोना येईल, टाळेबंद व्हावे लागेल, ही भीती अनेकांना आहे. मुले चार पैसे आणत आहेत. तेवढाच कुटुंबाला आधार होतो, अशा जड आवाजात काही पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
260721\img_20210726_165227.jpg
विध्यार्थी