गणवेशाविनाच प्रवेशोत्सव साजरा
By admin | Published: June 28, 2017 12:47 AM2017-06-28T00:47:29+5:302017-06-28T00:47:29+5:30
मंगळवारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद व खासगी शाळांचा पहिला ठोका वाजला.
विद्यार्थ्यांचा हिरमोड : जुन्या गणवेशातच विद्यार्थ्यांचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मंगळवारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद व खासगी शाळांचा पहिला ठोका वाजला. दाखलपात्र विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढून त्यांचे शाळेमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये बैलबंडीवर तर काही शाळांमध्ये दुचाकीवर विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्यात आले व पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. एकूणच पहिल्या दिवशी जल्लोष झाला. मात्र गणवेशाची रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांची हिरमोड होवून पहिला दिवस, प्रवेशोत्सव जुन्या गणवेशातच साजरा करण्याची वेळ आली.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शासन विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या अनु-जाती, जमाती व सर्व मुलींना मोफत गणवेश देण्यात येतात. या सत्रापासून गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु २७ जूनला शाळा सुरु होवूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात कवडीही जमा झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अंदाजे १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशाविनाच शाळेत जावे लागले.
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व खाजगी शाळेतील वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढावी म्हणून व श्रीमंत, गरीब असा भेदभाव नष्ट व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. यासाठी शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांना एका गणवेशामागे दोनशे रुपये देण्याचे ठरविले. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार होती. मंगळवारला विदर्भातील जिल्हा परिषद शाळा सुरु झाल्या. पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. मात्र गणवेशाची रक्कम जमा न झाल्याने पालकांनी गणवेश घेतले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवे सत्र जुन्या गणवेशावरच सुरु करण्याची वेळ आली.
या अगोदर दोन गणवेशाची रक्कम त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती. मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती मिळवून ढोलीमध्ये गणवेश खरेदी करीत होते. काही रक्कम कमी गेल्यास मुख्याध्यापक व समिती काही रक्कम टाकूण गणवेश खरेदी करीत होते. पण यामध्ये भ्रष्टाचार होण्याच्या तक्रारी वाढल्याने ही रक्कम आता विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात टाकण्याचे शासनाने ठरविले. मात्र मंगळवारला शाळा सुरु होवूनही एक रूपयाही विद्यार्थ्यांचा खात्यावर जमा झाला नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे निधी पाठविण्याची प्रक्रिया महिनाभरापासून सुरु असल्याचे सांगितले जात आहे. परंतु कवडीही या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेली नाही. त्यामुळे यंदाचा प्रवेशोत्सव गणवेशाविनाच विद्यार्थ्यांना साजरा करावा लागला. या प्रकारामुळे अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-आणि संपूर्ण गावकऱ्यांनी वाजविली शाळेची घंटा
नागभीड : शाळेच्या पहिल्या दिवशी दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देवून प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षकांना दिले. पण, कोरंबी येथे आगळावेगळा प्रवेशोत्सव साजरा झाला. कोरंबीच्या प्रत्येक नागरिकांनी या प्रवेशोत्सवास हजेरी लावून शाळेची पहिली घंटा वाजविली. कोरंबी हे दोन-अडीचशे लोकसंख्येचे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. चारही बाजूने डोंगर आणि मधोमध हे गाव असून नागभीडपासून गावाचे अंतर १८ ते २० किमी आहे. गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने सरकारी अधिकारी अभावानेच या गावात जातात. पण नागभीडचे सभापती रवी देशमुख आणि संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी याच गावातील प्रवेशोत्सवाला हजेरी लावण्याचे निश्चित केले आणि गावकऱ्यांची शाळेप्रती असलेली सकारात्मक भावना बघून अचंबित झाले. अगदी गावाच्या प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात सुरुवात झाली. एका सजवलेल्या बैलबंडीवर दाखलपात्र विद्यार्थ्यांना बसविण्यात आले आणि या बैलबंडीची संपूर्ण विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या साक्षीने, ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्याने मिरवणूक फिरल्यानंतर येथील प्राथमिक शाळेत मिरवणुकीचे विसर्जन झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती रवी देशमुख होते. संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार, शिक्षण विस्तार अधिकारी एन. के. भानारकर व गावातील गणमान्य नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात सभापती देशमुख आणि बीडीओ तोडेवार यांचा शाळा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चिमूर तालुक्यात प्रवेशोत्सव साजरा
चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६० व खाजगी ४५ शाळांमध्ये मंगळवारी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले व त्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. चिमूरचे गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवरा येथे विद्यार्थ्यांना पुस्तक देवून विद्यार्थ्याचे स्वागत केले.
गणवेशाचे अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. मात्र ही प्रक्रिया शासनस्तरावर सुरू आहे. त्यामुळे रक्कम निश्चित केव्हा जमा होणार हे सांगता येणार नाही. निधी मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती केली जाणार नाही.
- राम गारकर, शिक्षणाधिकारी,
प्राथमिक, जिल्हा परिषद, चंद्रपूर.