घरोघरी साजरा होणार पोषण उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:48 AM2019-09-02T00:48:45+5:302019-09-02T00:49:13+5:30
राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदमधील कन्नमवार सभागृहात जिल्हा अभिसरण समितीची बैठक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसर देशात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदमधील कन्नमवार सभागृहात जिल्हा अभिसरण समितीची बैठक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली.
बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, उपमुख्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उपमुख्यकारी अधिकारी विजय पचारे यांच्यासह १५ तालुक्यातील सर्वतालुका वैद्यकीय अधिकारी बाल प्रकल्प अधिकारी, विस्ताार अधिकारी, पोषण अभियान अंतर्गत तालुका समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत विविध विभागांचा समन्वय साधून १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पोषण माहच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. हे अभियान महिला व बाल विकास विभाग, ग्राम विकास विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभाग या विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात राबविण्यात येणार असून प्रत्येकाच्या घरोघरी हा पोषण उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
पोषण माहमध्ये जिल्ह्याने चांगले काम करून पोषण आहाराचे महत्व पटवून द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. या बैठकीमध्ये सर्व विभगाांच्या सहकार्याने पोषण अभियानात सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना दिले.
महिनाभर राबविणार विविध उपक्रम
या अभियानात बाळाचे पहिले १००० दिवस, अनेमिया, अतिसार, हाथ धुणे, स्वच्छता, पौष्टिक आहार या मुख्य घटनासोबत महिनाभर तब्बल विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने हे अभियान मोठ्या स्वरूपात राबविण्यासाठी केंद्राच्या उपक्रमासह जिल्हास्तरीय उपक्रमांचेदेखील आयोजन केले आहे. अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आणि शाळेच्या माध्यमातून या उपक्रमांचे महिनाभर आयोजन केले जाणार आहे. यामध्ये पोषण आहारविषयी जनसभा, उत्तम आरोग्यासाठी पोषणाचे महत्व या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करणे, गरोदर मातेच्या पोषक आहाराविषयी चर्चा, अनेमिया निर्मूलनासाठी उपययोजना आदी विषयावर चर्चासत्र, विशेष ग्रामसभा, जनजागृतीसाठी प्रभाग फेरी काढण्यात येणार आहे.