विहीरगाव परिसरातील गावांमध्ये तापाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:46+5:302021-05-10T04:27:46+5:30
राजुरा : तालुक्यात गोवरी व चुनाळ्यातील स्थिती आटोक्यात येते न येते तोच इतरही काही भागात कोरोनाची स्थिती भयावह ...
राजुरा : तालुक्यात गोवरी व चुनाळ्यातील स्थिती आटोक्यात येते न येते तोच इतरही काही भागात कोरोनाची स्थिती भयावह होत आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे अनेक बधितांचा तडफडून मृत्यू होत आहे. सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू असताना आता जनतेवर व्हायरल फीव्हरने मारा केल्याचे पहायला मिळत आहे.
आजघडीला विहीरगाव, चिचबोडी, वरूर रोड, सोडो गावात जीवघेण्या तापाचा कहर सुरू आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या सावटात जनतेचा श्वास गुदमरू लागला असतानाच आता व्हायरल फीव्हरने दहशत निर्माण केल्याने जनतेचा जीव टांगलीला लागला आहे. जनता जीवन-मरणाच्या दारात उभी असताना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत मोठा रोष पाहायला मिळत आहे.
तालुक्यावर कोरोना विषाणूचे संकट उभे ठाकले आहे. अनेक गावे कोरोना हॅटस्पॉट ठरत आहेत. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने कुटुंबांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रुग्णवाढीसोबतच मृत्यूचा आकडा फुगत असल्याने जनतेमध्ये थरकाप सुटला आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधेअभावी काही कोरोनाबधितांचा तडफडून मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे कोविडने हाहाकार माजवला असतानाच आता जनतेवर व्हायरल फीव्हरचा धोका निर्माण झाला आहे.
बॉक्स
रुग्णांचे होत आहे मृत्यू
विहीरगाव या गावात कोरोना व तापाने एका महिन्यात १५ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात श्रीकांत वाढई व संतोष वाढई या सख्ख्या भावंडांचा तापाने मृत्यू झाला आहे. बंडू मोहुर्ले, मंगेश कोडापे, सुधाकर वैद्य यांनासुध्दा ताप व न्युमोनियाने जीव गमवावा लागला आहे. सोडो येथे कौरासे नामक महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच काही कोविड बाधितांचा तडफडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वरूर रोड, सोडो व चिचबोडी गावातसुद्धा व्हायरल फिव्हरचे थैमान आहे. या दोन्ही गावांत अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत.