काही दिवसात कोविड लस सर्वांना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:59+5:302021-05-08T04:28:59+5:30
कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची माहिती वरोरा :१८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड लसीचे दोन डोस मिळावे, त्या प्रमाणात कोविड लस घेण्याचा ...

काही दिवसात कोविड लस सर्वांना मिळणार
कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची माहिती
वरोरा :१८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड लसीचे दोन डोस मिळावे, त्या प्रमाणात कोविड लस घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, विविध कंपन्यांकडून निविदा मागणी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आवश्यक असलेला लसीचा पुरवठा होणार आहे. त्याकरिता तयारी ठेवावी, अशा सूचना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना करण्यात आल्या. यासंदर्भात वरोरा येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. बैठकीमध्ये शहर व ग्रामीण भागातील कोविड उपाययोजनांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. त्यानंतर ट्रामा केअर युनिट व उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डात जाऊन कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शहरातील जुन्या नगरपरिषदमधील लसीकरण केंद्रास भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीलेश पांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश चवरे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक अंकुश राठोड, संवर्ग विकास अधिकारी संजय वानखेडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळ मुंजाकर, पंचायत समिती सभापती रवींद्र धोपटे, बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, नगरसेवक छोटू शेख, रुग्णालय आमदार प्रतिनिधी सुभाष दांदळे, सुनील वरखडे, अनिल वोटिंग आदी उपस्थित होते.
बॉक्स
आरोग्य चमूचे केले कौतुक
वरोरा शहर व ग्रामीण भागात आरोग्याच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळ मुंजाकर व त्यांचे सहकारी चांगले काम करीत असल्याची माहिती खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिली. त्यांनी आरोग्याच्या या चमूचे कौतुक करीत आणखी चांगले काम करा, शासन पूर्णपणे पाठीशी आहे, कुठली मदत कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.