शेतीच्या हंगामात निवडणुकीची रणधुमाळी
By Admin | Published: July 12, 2015 01:16 AM2015-07-12T01:16:31+5:302015-07-12T01:16:31+5:30
४ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.
सावली : ४ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. ऐन शेतीच्या हंगामात निवडणूका आल्याने या निवडणुकीत वेगळीच रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे.
सावली तालुक्यातील ५५ ग्रामपंचायती पैकी ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका व दोन ग्रामपंचायतीची पोट निवडणूक येत्या ४ आॅगस्टला होणार आहे. नामनिर्देशन पत्र पहिल्यांदाच आॅनलाईन भरावे लागत असल्याने उमेदवारांमध्ये कमालीचे औस्त्युक्य आणि तेवढाच गोंधळ निर्माण झाला आहे. १३ ते २० जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्र भरावयाचे आहे. संबंधित संकेतस्थळार सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
सावली तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्याने सावली येथील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. सावली नगर वगळता एकूण ६७ हजार ७०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ३३ हजार १२८ महिला व ३४ हजार ५७८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. शेतीच्या हंगामात निवडणूका आल्याने मतदारांना सुवर्णसंधी चालून आली आहे. शेतीच्या मजुरीवर जायचे की मतदान करायचे या द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या मतदारांची नाळ ओळखण्यात सर्वच पक्ष प्रमुख तरबेज असले तरी मतदान आपल्या बाजुने करण्यासाठी पक्षांना कसरतच करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)