कापड दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 10:53 AM2022-11-05T10:53:49+5:302022-11-05T10:56:22+5:30
जटपुरा गेट परिसरातील घटना; सतर्कतेने मोठा धोका टळला
चंद्रपूर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या जटपुरा गेट परिसरात असलेल्या एमफोरयू कापड दुकानाला भीषण आग लागल्याने लाखोंचा माल खाक झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. आग लागताच अग्निशमन पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचून नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत लाखोंचा माल खाक झाल्याची माहिती आहे.
चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरातील वसंत भवनाच्या चाळीत बरीच दुकाने आहेत. या मार्गावरील दुकानांतही प्रचंड गर्दी असते. वाहनांनी गजबजलेल्या वसंत भवनाच्या चाळीत एमफोरयू नावाचे कापड काही वर्षांपासून सुरू आहे. या कापड दुकानाला गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे मोठी तारांबळ उडाली. नागरिकांची गर्दी उसळल्याने वाहतुकीचाही खाेळंबा निर्माण झाला. आग लागताच लगेच महानगर पालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. पथक अवघ्या काही वेळात घटनास्थळावर पोहोचले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यास यश मिळविले. मात्र, तोपर्यंत आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
आगीच्या घटनांची मालिका
चंद्रपुरातील वर्दळीच्या दुकानात व हॉटेलात आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. वर्षभरापूर्वी याच मार्गावरील एका कापड दुकानाला आग लागली होती. या घटनेतही मोठे नुकसान झाले; परंतु आगीचे नेमके कारण पोलिसातून पुढे आले नव्हते. लोकमान्य टिळक शाळेजवळील मद्रास कॅपेलाही काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने आस्थापनांकडून दुकानांची इलेक्ट्रिक तपासणी होते की नाही अथवा आगीमागे विम्यासारखे कारणे आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
वसंत भवनचे फायर ॲाडिट केव्हा?
वसंत भवन हे जिल्हा परिषदच्या मालकीचे आहे. या इमारतीच्या दुकान चाळीचे भाडे आजच्या बाजारभाड्याच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे इमारतीतून मिळणारा तुटपुंजा उत्पन्न आणि डागडुजीचा खर्च अधिक अशी स्थिती आहे. अल्पभाड्याने वर्षानुवर्षे दुकाने सुरू असलेल्या या चाळीत आग लागल्याने जिल्हा परिषदचे नुकसान झाले. ही भरपाई करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. वसंत भवनचे फायर ऑडिट करा, ही मागणी माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी यापूर्वी अनेकदा केली होती. आगीच्या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.