८० वर्षांच्या आजोबाचा कडाक्याच्या थंडीत जीवघेणा संघर्ष
By admin | Published: January 16, 2017 12:38 AM2017-01-16T00:38:31+5:302017-01-16T00:38:31+5:30
आयुष्याच्या सायंकाळी सुखाचे चार दिवस मुला-नातवंडासोबत घालवावे, अशी सर्वांचीच धडपड असते.
वन्यप्राण्यांकडून पीक उद्ध्वस्त : आयुष्याच्या सायंकाळीही शेतात जागल
प्रकाश काळे गोवरी
आयुष्याच्या सायंकाळी सुखाचे चार दिवस मुला-नातवंडासोबत घालवावे, अशी सर्वांचीच धडपड असते. परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी कधी सुखाचे चार क्षण आलेही नाही. त्यांच्या आयुष्यात संकटाची संघर्षमय मालिकाच पुजली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही पिकांच्या रक्षणासाठी ८० वर्षांच्या आजोबाचा जीवघेणा संघर्ष सुरूच आहे.
राजुरा तालुक्यातील खामोना येथील मारोती सोमापुरके (८०) या जिगरबाज आजोबाचा संघर्ष कुटुंबीयांसाठी आधारवड ठरला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने दिवस-रात्र एक करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत वन्यप्राण्यांकडून उद्धवस्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची लढाई अशीच सुरू आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने रात्री बाहेर पडणे कठीण आहे. बोचऱ्या थंडीत रात्र कुडकुडत काढणे व जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणे ही ८० वर्षाचा आजोबाला आयुष्याच्या सायंकाळीही धडपड करावी लागत आहे. पिकांचे रक्षण करताना वन्यप्राण्यांकडून स्वत:चा बचाव करता यावा आणि जंगली जनावर दुरूनच दिसावे, यासाठी त्यांनी शेतात मचाण उभारली आहे.
सध्या शेतात कापूस, तूर, गहू, हरभरा ही पिके डौलाने उभी आहेत. मात्र, एका रात्रीतून या पिकांची वन्यप्राण्यांकडून वाट लावण्यात येत आहे. शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटात भरडला जात आहे. वन्यप्राणी पीक उद्धवस्त करीत असल्याने शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. त्यामुळे ८० वर्षांच्या या आजोबांनी पिकांच्या रक्षणासाठी शेतातच डेरा टाकला आहे.
‘जिना यहाँ, मरना यहाँ’, यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका आहे. कधी हिंस्रपशू येऊन शेतकऱ्याचा घास घेईल, हे सांगणेही कठीण आहे. परंतु, हाताय पीक आले नाही, तर कर्जाचा डोंगर पुन्हा वाढेल, या विचाराने जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणे सुरू आहे.
शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा संघर्ष कायम
वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे कोणी कधी लक्षही दिले नाही. त्यामुळे पिकांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना पिकांची ‘राखण’ करावी लागत आहे. हा कधीही न संपणारा जीवन मरणाचा संघर्ष आजही कायम आहे.
हातात आलेले वन्यप्राणी पीक उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राणी दिवस-रात्र शेतात धुमाकूळ घालत असल्याने उत्पन्न मिळणार नाही. म्हणून वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतात जागलं करावे लागत आहे.
- मारोती सोमापुरके,
शेतकरी, खामोना.