विदर्भ राज्यासाठी वैधानिक मार्गाने लढा उभारणार
By Admin | Published: June 1, 2016 01:26 AM2016-06-01T01:26:27+5:302016-06-01T01:26:27+5:30
विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला.
अनिल किलोर : जनता महाविद्यालयात पार पडली विदर्भ राज्य समन्वय समितीची बैठक
चंद्रपूर : विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास आता शक्य नसल्यामुळे आता शांततामय व वैधानिक मार्गाने आम्ही विदर्भ राज्याचा लढा उभारू, असे प्रतिपादन विदर्भ राज्य समन्वय समिती तथा जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी केले आहे.
स्थानिक जनता महाविद्यालयात शुक्रवारी विदर्भ राज्य समन्वय समितीचे वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, जनमंचचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. शरद पाटील, जिल्हा समन्वयक अॅड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रकाश इटनकर, उमाकांत धांडे, अॅड. मनोहर रडके, अमिताभ पावडे, रामभाऊ आखरे, किशोर गुल्हाने, नरेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
अॅड. किलोर पुढे म्हणाले, विदर्भात १७ हजार मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यापैकी केवळ दोन हजार मेगावॅटच येथे वापरली जाते. १५ हजार मेगावॅट वीज उर्वरित महाराष्ट्र वापरतो. इथल्या विजेच्या बळावर तिकडे उद्योग उभे होतात. सिंचनासाठी विद्युत पंप चालविले जातात. मात्र विदर्भात लोडशेडिंगच्या नावाने सिंचनाकरिता धड आठ तासही विद्युत पुरवठा होत नाही. वीज उत्पादन करताना प्रदूषणाचा सामना करणाऱ्या विदर्भातील जनतेला आणि उर्वरीत महाराष्ट्रील जनतेला मात्र एकाच दराने वीज मिळते. यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी जनजागृती करण्याकरिता शहरापासून गावपातळी पर्यंत संघटनात्मक बांधणी करुन विदर्भातील जनतेपर्यंत आजवर झालेल्या अन्यायाची माहिती पोहोचवू, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा.शरद पाटील, अॅड.मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. गोविंद भेंडारकर यांनी तर आभार उमाकांत धांडे यांनी मानले. याप्रसंगी प्रभाकर पारखी, हिराचंद बोरकुटे, डॉ.ईश्वर कुरेकर, तिराणिक, बशीरभाई, विजय मालीकर, सुनील वडस्कर, दीपक गोंडे, अमृत शेंडे, अमोल कुचनवार, नारायण डाखरे, लटारी उरकुडे, साधुजी मुसळे, लिलाधर खंगार, सतीश सोयाम, अमित लोनबले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (प्रतिनिधी)