विनापरवाना कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:15+5:302021-05-07T04:30:15+5:30
मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी भटकावे लागत आहे. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेसमोर असलेल्या शफीक ...
मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी भटकावे लागत आहे. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेसमोर असलेल्या शफीक रुग्णालयाला बाॅम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार परवानगी आहे. मात्र येथे कोविड रुग्णांवरही उपचार केले जात असल्याची माहिती मिळताच अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयावर धाड टाकली. या वेळी त्यांना मोठ्या प्रमाणात औषधसाठा आढळून आला. यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना विचारले असता रुग्णालयात हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शहर पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आंभोरे पुढील तपास करीत आहेत.
बाॅक्स
श्वेता हाॅस्पिटलच्या डीसीएचची मान्यता रद्द
चंद्रपूर येथील श्वेता हाॅस्पिटलला जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने डेडिकेटेड हेल्थ केअर रुग्णालय म्हणून मान्यता दिली होती. मात्र या रुग्णालयात रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अतिरिक्त शुल्क घेतल्यावरून रुग्णांचे नातेवाईक व डाॅक्टरांमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला. दरम्यान, या घटनेची मनपा आरोग्य प्रशासनाने दखल घेतली. याच कालावधीत खासदार बाळू धानोरकर यांनी श्वेता हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारी श्वेता हॉस्पिटलच्या डीसीएचची मान्यता रद्द केल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. आविष्कार खंडारे यांनी दिली.