संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:20 PM2018-07-15T23:20:17+5:302018-07-15T23:20:42+5:30
चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करून करावे, यासाठी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सोमवारी विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करून करावे, यासाठी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सोमवारी विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रपूर-मूल हा नागपूर मार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गाने नेहमी लोकप्रतिनिधींचा राबता असतानाही या रस्त्याचे बांधकाम झालेले नाही. या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे बुजविणे गरजेचे होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गकडे गेला आहे. रस्त्यात एकही खड्डा पडला की तो लगेच कंत्राटदारामार्फत बुजवावा लागतो. मात्र येथे असंख्य खड्डे पडले असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या घटनेला हा विभाग आणि कंत्राटदार जबाबदार आहे, असा आरोप आ. वडेट्टीवार यांनी केला. या खड्ड्यांनी नंदा बेहरम या शिक्षिकेसह काजल पाल या एमबीएच्या विद्यार्थिनीचा बळी घेतला. काजल ही एकुलती एक मुलगी असून ती त्या घराचा आधार होती. त्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी सायंकाळपर्यंत मदत मिळाली नाही, तर परिणाम वाईट होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हा अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, महिला काँग्रेसच्या नंदा अल्लुरवार, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, बल्लारपूर तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, संतोष लहामगे, सुभाष गौर, शिवा राव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फुटपाथ कमी करण्यासाठी अडीच कोटी
चंद्रपूर शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत रस्ता अपुरा पडत असल्यामुळे अडीच कोटी महानगर पालिकेने मंजुर केले आहे. शहरात अमृत योजनेसाठी रस्ते फोडणे सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर फुटुपाथ कमी करता येते. आधीच फुटपाथ फोडून ते अरुंद करणार आणि नंतर पुन्हा अमृतसाठी रस्ते फोडणार हा प्रकार मनपा करीत आहे. याला काँग्रेस नगरसेवकांनी विरोधही केला, याकडेही लक्ष वेधून नाराजी व्यक्त केली.
दारूबंदीला विरोध नाही, अंमलबजावणी करा
दारूबंदीला आमचा विरोध नाही. मात्र या दारुबंदीने पोलिसांचे बंगले बनत आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंद झाली नाही, तेथील ठाणेदारांवर कारवाई करून दारू हद्दपार करावी, याकडेही लक्ष वेधले.