उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:01 AM2018-05-18T00:01:49+5:302018-05-18T00:01:49+5:30
चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे.
या उड्डाण पुलाचा आरखडा, निधी आणि तांत्रिक मंजुरी होऊनही अपेक्षित जागेवरील अतिक्रमण केलेल्या रहिवाशांना न्याय देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली होती. त्यानुसार या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी एक उच्चस्तरीय सचिव गट निर्माण करण्यात आला होता. या समितीने सकारात्मक अहवाल दिला असून बाबुपेठ उड्डाण पुलाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणधारकांना आता एकरकमी नुकसान भरपाई मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अतिक्रमणधारकांच्या नुकसान भरपाईसाठी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, यासाठी मंत्रिमंडळात हा विषय लावून धरला होता. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे २५ कोटी रुपयांचा निधी वळता करण्यात आला होता. यासोबतच केंद्र शासनाच्या स्तरावर रेल्वे विभागाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे विभागाच्या पहिल्या अर्थ संकल्पात बाबुपेठ उडाणपुलाला मंजुरी मिळवून देण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले होते. बाबुपेठच्या नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. नाना श्यामकुळे यांनी मनपा ते मुख्यमंत्री असा संपर्क ठेऊन उड्डाण पुलाचे काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न चालविले होते. उड्डाण पुलाच्या जागेवरील ६८ मालमत्ताधारकांना सन २०१५ च्या दरसुचीनुसार तीन कोटी १५ लाख ०५ हजार ६३५ रु. मोबदल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे तर रेल्वेच्या जागेवरील ७३ मालमत्ताधारकांसाठी ९५ लाख ४९ हजार ७७२ रु. चा प्रस्ताव आहे. एकूण चार कोटी १० लाख ५५ हजार ४०७ रुपयांच्या निधीची यासाठी आवश्यकता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने बाबुपेठ उड्डाणपुलाच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर झाले असून सुमारे ६२ कोटी रुपयांचा निधी खर्चून या पुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.