अखेर ग्रामीण भागात क्वारंटाईन सेंटरसाठी शाळांचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:26 AM2021-05-01T04:26:38+5:302021-05-01T04:26:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मासळ बु : ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने दररोज नवे रुग्ण समोर येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ बु : ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने दररोज नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे कोविडची सौम्य लक्षणे असणारे व बाहेरगावाहून येणाऱ्यांकडून कोविडचा प्रसार होऊ नये, याबाबत ‘लोकमत’ने दिनांक २५ एप्रिलला ‘ग्रामीण भागातील शाळा क्वारंटाईन सेंटर बनवा’, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत सरपंच विकास धारणे यांनी ग्रामपंचायतीमार्फत राजीव गांधी विद्यालय क्वारंटाईन सेंटरसाठी अधिग्रहित केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिक हंगामी मजुरीसाठी शहराकडे धाव घेतात. हंगाम संपल्यानंतर ते गावाकडे परत येतात. त्यांना गृह अलगीकरण किंवा क्वारंटाईनसाठी पाहिजे त्या प्रमाणात त्यांच्याकडे सोयी उपलब्ध राहात नाहीत. त्यामुळे कोरोना समितीची बैठक सरपंच विकास धारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. क्वारंटाईन सेंटर गावातच झाल्याने अडचण निर्माण होणार नाही. मासळ बु. येथे राजीव गांधी विद्यालय क्वारंटाईनसाठी ग्रामपंचायतीने ताब्यात घेतले आहे. या क्वारंटाईन सेंटरची क्षमता २० लोकांची राहणार आहे. यावर ग्रामपंचायत कमिटी, आरोग्य विभाग व गावातील प्रतिष्ठित नागरिक लक्ष ठेवणार आहेत. तिथेच त्यांना पंधरा दिवस औषधोपचारांची सोय मिळणार आहे. कोविडचे सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे. या बैठकीला सरपंच विकास धारणे, उपसरपंच प्रमोद खापर्डे, ग्रामसेवक प्रशांत लामगे, तलाठी अमोल घाटे, ग्रामपंचायत सदस्य प्रा. वामन बांगडे, रंजना बन्सोड, ललिता बन्सोड, संजय धारणे, गायत्री खामनकर, मनिषा गराटे, अनिता नन्नावरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशा जांभुळे, आरोग्यसेविका टोकलवार, आरोग्यसेवक सावसाकडे, अंगणवाडी सेविका शीला धारणे, शोभा गायकवाड, कुसुम धारणे, मदतनीस निशा पाटील, काजल राऊत, शशिकला वांढरे, आशा सेविका वनिता गणवीर, शालू बारेकर, प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.