अखेर ‘श्रीनिवासन’चे शवच सापडले

By admin | Published: April 28, 2017 12:49 AM2017-04-28T00:49:06+5:302017-04-28T00:49:06+5:30

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन या वाघाचे अखेर शवच हाती लागले. शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाने

Finally, the body of Srinivasan was found | अखेर ‘श्रीनिवासन’चे शवच सापडले

अखेर ‘श्रीनिवासन’चे शवच सापडले

Next

करंट लागून मृत्यू : नागभीड तालुक्यातील म्हसली बिटातील घटना
नागभीड : गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन या वाघाचे अखेर शवच हाती लागले. शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाने श्रीनिवासनचा मृत्यू झाला. यातील एक आरोपी वनविभागाच्या ताब्यात असून २० एप्रिल रोजीच श्रीनिवासनचा मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे.
आशिया खंडात प्रसिद्ध पावलेल्या ‘जय’ या वाघाचा बछडा अशी ‘श्रीनिवासन’ची ओळख होती. जयप्रमाणेच श्रीनिवासनचे सुद्धा उमरेड-कऱ्हांडल हेच कार्यक्षेत्र होते. पण हे क्षेत्र नागभीड वनपरिक्षेत्रातील पाहार्णी-म्हसली या वनबिटांना जवळ असल्याने जय प्रमाणेच श्रीनिवासनचे सुद्धा या भागात नेहमीच जाणे-येणे असायचे. १६ डिसेंबर २०१६ रोजी याच श्रीनिवासनवर म्हसली जंगलात कॉलर आयडी लावण्यात आली होती.
१७ एप्रिल रोजी कऱ्हांडला आणि ब्रह्मपुरी वनविभागाला श्रीनिवासनचे एकच ठिकाण मिळत होते. एकाच ठिकाणी लोकेशन मिळत असल्याने वनविभागाला शंका आली. त्यांनी चौकशी केली असता, श्रीनिवासनला लावण्यात आलेला कॉलर आयडी तुटलेल्या अवस्थेत म्हसली बिटातील विलम नाल्यात आढळून आला. एक तर कॉलर आयडी तुटत नाही. मग ती तुटली कशी यावरुन अधिकाऱ्यांचा संशय बळावला आणि त्याच परिसरात चौकशीचे केंद्र बनवले.
या चौकशीत १९ एप्रिलला रात्रीचे २ वाजून १६ मिनिटांचा शेवटचा लोकेशनही आरोपी महादेव बापुराव इरपाते यांच्या शेतातच मिळाला. यानंतर वनाधिकाऱ्यांनी महादेव इरपाते यांची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याने श्रीनिवासनला पुरल्याची जागाही दाखविली. त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला. (तालुका प्रतिनिधी)

स्नुपर डॉगची मदत
आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासनचा शोध घेण्यासाठी वनविभाग जंग जंग पछाडत होता. विशेष ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. पाणवठे पालथे घालण्यात आले होते. पण तपास लागत नसल्याने शेवटी स्नोपर डॉगचीही मदत घ्यावी लागली.
कॉलर आयडी
पेंचिसने काढली
श्रीनिवासनचा कॉलर आयडी हाताने निघत नव्हता म्हणून पेंचिस आणून कॉलर आयडी काढला व तो जवळच नाल्यात नेऊन टाकला, अशी कबुलीही आरोपी महादेव इरपाते याने दिली.

मी माझ्या शेतीच्या रखवालीसाठी विद्युत करंट लावला होता. शेतात धानाची डबल फसल घेतली आहे. या हंगामाला रानडुकरांचा मोठा त्रास होता, पण मी लावलेल्या विद्युत प्रवाहाने वाघच मरेल याची मला कल्पणा नव्हती. २० तारखेला सकाळी वाघ मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर मी व माझे व्याही शुभन उईके मिळून खड्डा खोदून वाघाला पूरले.
- महादेव इरपाते, आरोपी.

Web Title: Finally, the body of Srinivasan was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.