अखेर नामांकनासाठी मिळाली मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:49 PM2018-11-19T21:49:53+5:302018-11-19T21:50:08+5:30
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रमामध्ये एक दिवसाची मुदतवाढ मिळाली असल्याचे एका परिपत्रकाद्वारे घोषित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रमामध्ये एक दिवसाची मुदतवाढ मिळाली असल्याचे एका परिपत्रकाद्वारे घोषित करण्यात आले आहे.
ब्रम्हपुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम यापूर्वी घोषित करण्यात आला होता. त्यात नामनिर्देशन पत्र वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असल्याचा कालावधी १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत व नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिदेर्शित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख २० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. परंतु नामनिर्देश पत्र व त्यासोबतचे शपथपत्र आॅनलाईन भरतेवेळी काही तांत्रिक अडचणीमुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन व त्यासोबतचे शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता आले नाही, असे काही निवडणूक निर्णय अधिकारी व राजकीय पक्षांनी आयोगाला कळविले होते. उद्भवलेली परिस्थिती व भारतीय संविधान तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १०-अ मधील तरतुदी लक्षात घेता मुदत संपणाºया ब्रम्हपुरी या अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र वेबसाईटवर भरण्यात व दाखल करण्याचा कालावधी २० नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत केला असून नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्शित झालेल्या उमेदवारांची यादी २१ नोव्हेंबरला प्रसिध्द करण्यात येईल. तसेच अपरिहार्य परिस्थितीत संबंधित नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र वेबसाईटवर भरून त्याची प्रिंट घेऊन सादर करणे शक्य नसल्यास ते आॅनलाईन पध्दतीने व पारंपरिक या दोन्ही पद्धतीने स्वीकारण्यास सुधारित कार्यक्रमानुसार आयोगाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, मतदानाचा दिनांक मतमोजणीचा दिनांक यात कोणताही बदल करण्यात आला नाही.