तब्बल वर्षभराच्या संघर्षानंतर मिळाला शेतकऱ्यांना पीक विमा
By साईनाथ कुचनकार | Published: August 6, 2023 06:49 PM2023-08-06T18:49:03+5:302023-08-06T18:49:40+5:30
महिला शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाला दिला होता निर्वाणीचा इशारा
साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: मागील वर्षी आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यातील काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, तर काहींना विविध त्रुट्या काढून पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे टाळले होते. दरम्यान, भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख येथे शंभर टक्के नुकसान झाले असतानाही अल्पनुकसान देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. मात्र, येथील काही जागरूक शेतकऱ्यांनी विशेषत: महिला शेतकऱ्यांनी अन्नदाता एकता मंचच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मात्र विमा कंपनी नरमली असून, मागील वर्षीच्या विम्याची रक्कम यावर्षी मिळणे सुरू झाले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. विविध ठिकाणी पुरामध्ये शेतीचे नुकसान झाले. भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) येथील संपूर्ण शेती पुराच्या पाण्याखाली आली होती. पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असतानाही काहींना अल्पनुकसान देऊन कंपनी मोकळी झाली. मात्र, अन्य शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यानंतर अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना प्रथम तालुका कृषी कार्यालय गाठून तक्रार केली. यानंतरही त्यांच्या पदरी निराशा आली. मात्र, शेतकऱ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. जिल्हा कृषी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन देण्याचा उपक्रम सुरू ठेवला. एवढेच नाही गावातील महिला शेतकऱ्यांनी थेट जिल्हा कृषी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विमा न दिल्यास कार्यालयातच बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर मात्र कृषी विभागाला जाग आली. विभागाने विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून चर्चा केली. यानंतर आता मागील वर्षीचा पीक विमा यावर्षी खात्यात जमा करणे सुरू केले आहे. मात्र, विमा पाॅलिसीनुसार शेतकऱ्यांना विमा न देता कमी देत असल्याने उर्वरित रक्कमही द्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
मागील वर्षी पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने काहींनाच अल्प नुकसानभरपाई दिली, तर काही शेतकऱ्यांना भरपाई मिळालीच नाही. यासंदर्भात विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. एवढेच नाही, तर गावातील महिला शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत आंदोलनाचा इशारा दिला होता. -संदीप खुटेमाटे, अध्यक्ष, अन्नदाता एकता मंच