अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:24+5:30
नरभक्षक बिबटयाला ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मेंडकी उपक्षेत्रातील नियतक्षेत्र चीचखेडा, डोर्ली गावाजवळ कक्ष क्रमांक १०१२ याठिकाणी गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. सदर बिबटयाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ब्रम्हपुरी तालुक्यातील चीचगाव, डोर्ली, बरडकिन्ही, वांद्रा, आवळगाव आदी गावातील नागरिकांनी केली होती आणि यामुळे लवकरात लवकर नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी वनविभागाच्या उत्तर वनपरिक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालत दोन महिलांचा व एका बालकाचा बळी घेणाºया बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सायंकाळी यश आले.
या नरभक्षक बिबटयाला ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मेंडकी उपक्षेत्रातील नियतक्षेत्र चीचखेडा, डोर्ली गावाजवळ कक्ष क्रमांक १०१२ याठिकाणी गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. सदर बिबटयाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ब्रम्हपुरी तालुक्यातील चीचगाव, डोर्ली, बरडकिन्ही, वांद्रा, आवळगाव आदी गावातील नागरिकांनी केली होती आणि यामुळे लवकरात लवकर नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले होते.
या बिबट्याने आतापर्यंत चीचखेडा, डोर्ली परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत दोन महिला आणि एका बालकाला या बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर हा बिबट याच परिसरात फिरत होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीच्या कामावरही परिणाम होत होता. या बिबट्याला जेरबंद करावे, अशी ओरड नागरिक करीत होते. तेव्हापासून वनविभागाचे अधिकारी रात्रंदिवस या परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी या बिबट्याला डोर्ली गावाजवळ कक्ष क्रमांक १०१२ बेशुध्द करून पिंजºयात जेरबंद करण्यात आले. यावेळी वनाधिकारी रामेश्वरी बोंगाळे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत एस. खोब्रागडे व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
३ डिसेंबरपासून वनविभाग होता गस्तीवर
यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ३ डिसेंबरपासून बिबटयाला जेरबंद करण्यासाठी परिसरात गस्त घालत होते. ७ डिसेंबरपासून रॅपिड रिस्पॉन्स टीम चंद्रपूर, एसटीपीएफ चिमूर, एसटीपीएफ मूल हे दिवसरात्र सदर बिबट्याचा शोध घेत गावासभोवताल फिरत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नरभक्षक बिबट्याला ४८ तासात जेरबंद करण्याचे आदेश दिले होते.