अखेर ‘रिलायन्स जीओ’ला परवानगी
By admin | Published: June 28, 2014 02:26 AM2014-06-28T02:26:30+5:302014-06-28T02:26:30+5:30
‘रिलायन्स जीओ इन्फोकॉम’च्या ४ जी केबलचे जाळे महानगरात पसरवण्यासाठी ३५ किलोमीटरचे खोदकाम करण्याची परवानगी अखेर मनपा प्रशासनाने दिली आहे.
चंद्रपूर : ‘रिलायन्स जीओ इन्फोकॉम’च्या ४ जी केबलचे जाळे महानगरात पसरवण्यासाठी ३५ किलोमीटरचे खोदकाम करण्याची परवानगी अखेर मनपा प्रशासनाने दिली आहे. खोदकाम
शुल्का व्यतिरिक्त रिलायन्स जीओ कंपनी मनपाला बोनस स्वरूपात काही कामे करून देणार असून यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार आहे. कोणत्या उद्देशाने
रिलायन्स जिओ हा अतिरिक्त खर्च करणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणातील मनपातील पदाधिकारी आणि नगरसेवकही चुप्पी साधून असल्याने आश्चर्य
व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आल्यानंतर आता पुन्हा रिलायन्स जिओसाठी खोदकाम केले जाणार असल्याने नागरिकांची डोकेदुखी दुपटीने
वाढणार आहे.
चंद्रपूर शहरात जवळपास १३५ किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी फक्त ३५ किलोमीटर रस्त्याचे खोदकाम करून रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने आपले ४ जीचे केबल टाकणार
असल्याचा दावा केला आहे. ३५ किलोमीटरच्या खोदकामासाठी रिलायन्स जीओ कंपनी महानगरपालिकेला साडेतीन कोटी रुपये शुल्क भरणार आहे. रिलायन्स जीओच्या खोदकामाला
परवानगी देण्यात येऊ नये म्हणून गेल्या वर्षी काही नगरसेवकांनी बराच गदारोळ केला होता. काही पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि एका अभियंत्यावर रिलायन्स जीओकडून पैसे
घेतल्याचा आरोपसुद्धा झाला होता. प्रचंड वादळ उठल्याने रिलायन्सच्या खोदकाम परवानगीचा विषय नंतर टांगून ठेवण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांनी सेवानिवृत्तीच्या
काळात वादग्रस्त विषयाला हात लावला नाही. मात्र रिलायन्स जीओच्या खोदकामाला परवानगी देण्यात यावी, यासाठी काही पदाधिकारी आणि अधिकारी सुरुवातीपासूनच इच्छुक होते.
हा केंद्र सरकारचा उपक्रम असल्याने रिलायन्स जीओ इन्फोकॉमच्या ४ जी केबल खोदकामासाठी केव्हातरी परवानगी द्यावीच लागणार होती. शहराच्या इतर भागात सार्वजनिक बांधकाम विभाग
आणि वेकोलि प्रसासनाने या खोदकामासाठी परवानगी दिली होती. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने काही अटींवर खोदकामाची परवानगी रोखून धरली होती. वास्ताविक शहरातील दोन
वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरूवातही याच काळात केली जाणे जवळजवळ निश्चित होते. त्यामुळे या कामाआधीच रिलायन्स जिओला खोदकामाची परवानगी देण्यात
यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी लावून धरली होती. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. आत रस्त्यांची कामे सुरू आहेत. बहुतांश रस्त्यांवर पहिला कोट चढलाही आहे. अशातच
आता गेल्या महिन्यात झालेल्या मनपाच्या आमसभेत रिलायन्स जीओच्या खोदकामाला परवानगी देण्याचा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. या कंपनीने खोदकाम शुल्काव्यतिरिक्त चंद्रपूर
शहरातील एकमेव ऐतिहासिक गार्डन मौलाना अबुल कलाम आझादचे सौंदर्यीकरण करून देण्याची हमी दिली. या सौंदर्यीकरणाच्या खर्चासाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
खर्चाचा आराखडाही तयार आहे. या व्यतिरिक्त साार्वजनिक शौचालयसुद्धा बांधून देणार आहे. तसेच ही कंपनी शहरात १०० टॉवर उभे करणार असून त्याचे शुल्कसुद्धा मोजण्याची तयारी
दर्शविली आहे. त्यामुळे खोदकामाला परवानगी दिल्याचा युक्तिवाद महानगरपालिका पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. रिलायन्स जीओने ३५ किलोमीटरच्या खोदकामाची परवानगी
मागितली असली तरी प्रत्यक्षात तीनपट खोदकाम केले जाणार असल्याची माहिती आहे. विनापरवानगीने होणाऱ्या कामातून आठ कोटी रुपये शुल्क वाचणार असून त्यातून आझाद बगिचाचे
सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालय निर्माण केले जाणार आहेत. अन्यथा रिलायन्स जीओला खोदकाम शुल्काव्यतिरिक्त इतका पैसा खर्च करण्याची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित केला
जात आहे. (शहर प्रतिनिधी)