अखेर नांदाफाटा येथे लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:26+5:302021-04-29T04:20:26+5:30
जि. प. सदस्यांनी दिला होता आमरण उपोषणाचा इशारा आवाळपूर : नांदा येथील लोकसंख्या १५ हजारांच्या वर आहे. मोठ्या प्रमाणात ...
जि. प. सदस्यांनी दिला होता आमरण उपोषणाचा इशारा
आवाळपूर : नांदा येथील लोकसंख्या १५ हजारांच्या वर आहे. मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहेत. लसीकरण केंद्राकरिता या ठिकाणी प्रशस्त अशा अनेक इमारती नांदा ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असून देखील
प्रशासन नांदा फाटा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करीत होते. जि. प. सदस्य यांनी आमरण उपोषणाचा इशारा देताच प्रशासन जागे झाले असून लसीकरण केंद्राला मान्यता देत अखेर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून नांदा येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यास टाळाटाळ सुरु होती. येथील जिल्हा परिषद सदस्य तथा कामगार नेते शिवचंद्र काळे यांनी जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत नांदाफाटा येथील लोकसंख्येचा विचार करून लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याची प्रशासनाला विनंती केली. दोनदा झालेल्या सभेत मुद्दा लावून धरला. परंतु प्रशासन लसीचा तुटवडा व आरोग्य केंद्र नसल्याचे कारण देत लसीकरण केंद्र देण्यास टाळाटाळ करीत होते.
नांदाफाटा परिसरातील वाढता कोरोनाचा संसर्ग, लसीकरणाकरिता नागरिकांची होणारी भटकंती, यामुळे जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना लसीकरण केंद्र तातडीने सुरू करावे, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नांदाफाटा येथे तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. २८ एप्रिलपासून सांस्कृतिक भवन नांदाफाटा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
नांदा ग्रामपंचायतीने सहकार्य लाभले असून लसीकरण केंद्राकरिता काॅम्प्युटर व डाटा ऑपरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.