अखेर चौकशी समितीने घेतले कर्मचाऱ्यांचे बयाण
By admin | Published: June 9, 2016 12:41 AM2016-06-09T00:41:32+5:302016-06-09T00:41:32+5:30
तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले.
दखल लोकमतची: प्रकरण बयाण गोपनियता भंगचे, अहवालाची प्रतीक्षा
भंडारा : तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. या प्रकरणाच्या वृत्तांची दखल घेत चौकशी समितीने सोमवारी पहेला केंद्र गाठून पाच कर्मचाऱ्यांचे बयाण घेतले. उर्वरीत ३ कर्मचाऱ्यांचे बयाण लवकरच घेतले जाणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसात अहवाल तयार करून आरोग्य समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या अहवालाकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)
चौकशी समितीचा चार तास ठिय्या
अहवालाची प्रतीक्षा : प्रकरण बयाण गोपनियता भंगचे
भंडारा : पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या दवडीपार उपकेंद्रात २२ डिसेंबर २०१५ ला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान कपाटात व टेबलावर अस्ताव्यस्त स्थितीत लसी आढळून आले होते. ती लस चुकुन बालकांना दिल्या गेली असती तर जीवितहानी झाली असती. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी वरिष्ठांकडे तशी माहिती सादर केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी कार्यरत १० कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविले होते. नोंदविलेले बयान गोपणीय ठेवले जातात. मात्र हे गोपणीय बयान सार्वजनिक झाले. याची मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीत दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून संबधितांचे बयाण रेकॉर्डिग केले. एकाच प्रकरणाचे तीनदा बयान नोंदविण्यात आले आहे.
पहेला आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे गोपनीय बयान सार्वजनिक झाल्यासंबधीचे वृत्त २१ एप्रिल रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. या प्रकरणात आरोग्य सहाय्यिकेचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र अद्यापही ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. त्यांना अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाविषयी जिल्हा आरोग्य समितीने पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती. जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य प्रदीप बुराडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चमू १० मे रोजी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होणार होती. मात्र काही कारणांमुळे चौकशी समिती पहेला येथे पोहचली नाही. त्यानंतर या प्रकरणाविषयी चर्चेला पेव फुटले होते. त्यानंतर ६ जून रोजी दुपारी १२ वाजता चौकशी समितीचे अध्यक्ष प्रदीप बुराडे, सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, चंदूलाल पिल्लारे, खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, तालुका आरोग्य अधिकारी अनुराधा जुगनाके पहेला आरोग्य केंद्रात धडकले. प्रकरणासंबधीत उपस्थित पाच कर्मचाऱ्यांचे लेखी बयान घेतले. दोन तक्रारकर्ते कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण व एक कर्मचारी सभेला गेल्यामुळे त्यांचे बयान घेण्यात आले नाही. त्या कर्मचाऱ्यांचे बयान लवकरच घेण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. त्यांचे बयान घेतल्यानंतर दोन-तीन दिवसात चौकशी समिती अहवाल तयार करणार आहे. चौकशीचा अहवाल सर्वसाधारण सभेपुर्वी जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत सादर करणार आहेत. (नगर प्रतिनिधी)