अखेर सैनिक कोविड शाळेतील केंद्रात औषधांचा पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:47+5:302021-05-03T04:22:47+5:30
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड (विसापूर) येथील शासकीय सैनिक शाळेत सुरू करण्यात आलेल्या कोविड केंद्रातील असुविधेबाबत लोकमतने ‘सैनिकी कोविड ...
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड (विसापूर) येथील शासकीय सैनिक शाळेत सुरू करण्यात आलेल्या कोविड केंद्रातील असुविधेबाबत लोकमतने ‘सैनिकी कोविड केंद्रात सुविधांसह औषधीही नाही’ या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासन जागे झाले व लगेच तिथे औषधींचा पुरवठा करण्यात आला.
डॉक्टर व स्टाफला विश्रांतीसाठी खोल्यासुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या. केंद्र स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेशा सफाई कामगारांचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांवर याचा सकारात्मक परिणाम झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
आजघडीला २७२ रुग्णांनी तिथे कोरोनावर मात केली असून, १५१ रुग्ण उपचार घेत आहेत. १७ गंभीर रुग्णांना चंद्रपूर येथे हलविले आहे तर मृत्यूदर हा शून्य आहे, अशी माहिती मिळाली. या कोविड केंद्रात प्रामुख्याने बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना या तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांना सर्व सुविधा मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.