...अखेर गावकऱ्यांसमोर वनाधिकारी नमलेच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 05:00 AM2022-06-13T05:00:00+5:302022-06-13T05:00:24+5:30
वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी उपवनसंरक्षक (बफर) चंद्रपूर यांच्यासोबत गावकऱ्यांची तत्काळ मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याबाबत उपाययोजना करता येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यात वन्यजीव - मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यात आजपर्यंत वाघाने १४ बळी घेतले असताना वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभाग कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाही. असे असतानाच नुकताच पडझरी येथे शुक्रवारी वाघाने हल्ला करून युवा शेतकऱ्याला ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच व गावकऱ्यांनी काँग्रेसचे नेते संतोष रावत यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती देताच तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाघाला जेरबंद करण्याची व कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले.
वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी उपवनसंरक्षक (बफर) चंद्रपूर यांच्यासोबत गावकऱ्यांची तत्काळ मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याबाबत उपाययोजना करता येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले. त्यानुसार शनिवारी दुपारी २ वाजता वनविभागाच्या रेस्ट हाऊस येथे स्थानिक सरपंच व गावकऱ्यांची उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्यासोबत मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याची ग्वाही देण्यात आली.
वाघ जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू
वनविभागाचे कर्मचारी वाघाला जेरबंद करण्यासाठी कामात लागले असल्याने वाघ केव्हा जेरबंद होईल, याकडे सर्व गावकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, कोसंबी ग्रामपंचायत सरपंच रवींद्र किसन कामडी, मारोडा येथील सरपंच भिकारू शेन्डे, भादुर्णी येथील सरपंच रेवता सोनुले, मोरवाही येथील सरपंच अनुराधा प्रमोद नेवारे, लोकनाथ नर्मलवार, उश्राळा येथील सरपंच बंडू नर्मलवार, सरपंच वंदना पेन्दोर, उपसरपंच वर्षा प्रवीण आरेकर, सुरेश फुलझेले, अशोक पुल्लावर उपस्थित होते.
वाघाला जेरबंद करण्यासाठी कर्मचारी कामाला लागले असून मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता जंगल सभोवताल सौरऊर्जेचे कुंपण लावून देण्यात येणार आहे.
-जी.आर. नायगमकर वनपरिक्षेत्र अधिकारी मूल